हा माझ्या गांधींचा भारत नाही तर नथुराम गोडसेचा भारत वाटत आहे. गोडसेचं काश्मीर बनवण्याचा कट रचला जात आहे. इथे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्यही नाही, असं वादग्रस्त विधा पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. सोमवारी दिल्लीतल्या जंतर-मंतर इथं झालेल्या एका आंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. काश्मीरची सद्यस्थिती सर्वांसमोर ठेवण्यासाठी आपण राजधानी दिल्लीत आल्याचं मुफ्ती म्हणाल्या.

मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करत काही गंभीर आरोपही केले आहेत. त्या म्हणाल्या, “केंद्र सरकार भारताच्या जनतेसमोर जम्मू काश्मीरमधली परिस्थिती शांततापूर्ण असल्याचा बनाव करत आहे. मात्र प्रत्यक्षात इथं रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरुन लोकांवर दहशतवादी विरोधी कायदा थोपला जात आहे. देशाच्या जनतेसमोर ज्या ‘नया काश्मीर’चा प्रचार केला जात आहे, ते खरं नाही. एका काश्मिरी पंडिताची दिवसाढवळ्या हत्या केली जाते, १८ महिने झाले एक मुलगी सैन्याच्या हातून मारल्या गेलेल्या आपल्या वडिलांचं प्रेत ताब्यात मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. काश्मीरमध्ये एका बिहारी व्यक्तीला ठार मारण्यात येतं”.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

केंद्र सरकारवर निशाणा साधताना मुफ्ती म्हणाल्या, “हा नवा भारत आहे, पण संविधानाबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाला इथं ‘तुकडे तुकडे गँग’चा सदस्य म्हणून हिणवलं जातं. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधलं जातं आणि त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. काश्मीरची परिस्थिती जो देशाच्या जनतेपुढे मांडू पाहतो, त्याला पाकिस्तानी म्हटलं जातं”.

कलम ३७० हटवण्याबद्दल जेव्हा मुफ्ती यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की काश्मिरी जनतेला कलम ३७० च्या नावाखाली लुटलं गेलं, फसवलं गेलं. भारतात अनेक अशी राज्यं आहेत जिथे बाहेरील राज्यातल्या लोकांना जमिनी विकत घेण्यासाठी बंदी आहे. मग जर केंद्र सरकारला त्या राज्यांबद्दल काही अडचणी नाहीत तर मग काश्मीरच्या बाबतीतच का आक्षेप? केंद्र सरकारने लवकरात लवकर जम्मू काश्मीरमधल्या जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे.