Mehbooba Mufti on Iran War: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आज दिल्लीतील इराणच्या दूतावासाला येथे भेट देऊन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी त्या म्हणाल्या, “काश्मिरी लोक इराणसोबत एकजुटीने उभे आहेत. इराण सध्या एपस्टाईन टोळीविरुद्ध एकट्याने लढत आहे.”
इराण विजय होण्यासाठी प्रार्थना
मुफ्ती पुढे म्हणाल्या की, “ज्यांचा उल्लेख एपस्टीन फाइल्समध्ये झाला आहे, ते सर्वजण बिन्यामिन नेतान्याहू यांच्या बाजूने उभे आहेत. इराणी नागरिकांच्या धैर्याला माझा सलाम आहे. काश्मिरी लोक इराणी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. इराण हा देश राक्षसी वृत्तीच्या देशांविरोधात एकट्याने लढत आहे आणि या युद्धात त्यांचा विजय व्हावा अशी आम्ही प्रार्थना करत आहोत.”
अली खामेनींचा मृत्यू
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणमधील अनेक मंत्री, अधिकारी आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणनेही इस्रायलच्या विविध शहरांवर हल्ले केले आहेत. तसेच अखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि इतर मालमत्तांवरही इराणकडून हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिया समुदायाकडून निषेध
अली खामेनी यांच्या हत्येनंतर जगभरातील अनेक ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलविरोधात शिया समुदायाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतातही विविध ठिकाणी निदर्शने करून अली खामेनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील लाल चौक येथे हजारो शिया मुस्लीम बांधव एकत्र जमले होते. त्यांनी अली खामेनी यांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच लेह येथेही अमेरिका आणि इस्रायलविरोधात निषेध नोंदवण्यात आला.
दरम्यान, इस्रायलने इराणची राजधानी तेहरान येथील लष्कराला पुरवठा केला जाणारा इंधन साठा लक्ष्य करत हल्ले केले. तसेच तेहरान येथील विमानतळावरही हल्ला झाल्याची माहिती आहे. याला प्रत्युत्तर देताना इराणने इस्रायलमधील अनेक शहरांवर तसेच अमेरिका आणि इस्रायलला मदत करणाऱ्या अखाती देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांवरही हल्ले केल्याचा दावा केला आहे.
