पंजाब नॅशनल बँकेत १३५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर आता भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान डोमिनिकामधील हायकोर्टात मेहुल चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित झाली आहे. त्यावर मेहुल चोक्सीने प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की तो “कायदा पाळणारा नागरिक” आहे आणि त्याने केवळ अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी भारत सोडला आहे.

न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चोक्सीने भारतीय अधिकाऱ्यांना स्वतःहून मुलाखत देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल असे चोक्सीने म्हटले आहे.

अमेरिकेत उपचारासाठी भारत सोडला

“मी भारतीय अधिकाऱ्यांना मुलाखत द्यायला आणि चौकशी संदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. मी भारतीय एजन्सींपासून पळत नाही आहे. अमेरिकेत उपचारासाठी जाण्यासाठी मी जेव्हा देश सोडला तेव्हा माझ्या विरुद्ध कोणतेही वॉरेंट नव्हते. तसेच कायद्याची अंमलबजावणी टाळली नाही”, असे ६२ वर्षीय चोक्सीने डोमिनिकामधील हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पंजाब नॅशनल बँकेत १३५०० कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार

पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करुन भारतीय बँकिंग उद्योगाला हादरवून टाकणारे मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात भारत सोडून पळून गेले होते. त्यानंतर चोक्सी अँटिग्वा येथे लपून बसला होता. तेव्हापासून अद्यापही तो भारतात परतलेला नाही. सीबीआय आणि इडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

चोक्सीने ३ जून रोजी दाखल केलेल्या याचिकेत पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता असे म्हटले आहे. रेड कॉर्नर इंटरपोल नोटीस ही आंतरराष्ट्रीय वॉरंट नसून शरण जाण्याचे आवाहन आहे, असा दावाही त्याने केला. चोक्सी पळून जाऊ शकतो या आरोपानंतर त्याने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.