Jeffrey Epstein allegations Melania Trump Press: सर्व जगाचे लक्ष अमेरिका-इराण युद्धविराम आणि त्यानंतर होऊ घातलेल्या शांतता चर्चेवर लागले असताना मेलानिया ट्रम्प यांनी गुरुवारी एक विशेष पत्रकार परिषद घेतली. मेलानिया यांनी या पत्रकार परिषदेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी निगडीत प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. व्हाईट हाऊसमधून मेलानिया यांनी केलेल्या संबोधनात एपस्टीनबरोबर कुठलेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मेलानिया यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी हीच वेळ का निवडली यावरुन आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा अर्थ देखील लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मेलानिया यांनी एपस्टीनसंबधित आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले?
“माझी एपस्टीनबरोबर कधीच मैत्री नव्हती. न्यूयॉर्क शहरात डोनाल्ड ट्रम्प, माझे आणि एपस्टीनचे मित्र बऱ्यापैकी एक असल्याने त्याने ठेवलेल्या पार्टीत जाण्याचा योग यायचा. स्पष्ट सांगायचे तर माझे आणि एपस्टीनचे कधीच संबंध नव्हते आणि त्यांच्याशी निगडीत इतर कोणाशी माझा संबंध होता. त्याचा सहकारी घिलेन मॅक्सवेल याच्याशी माझा संबंध नाही”, असे स्पष्टीकरण मेलानिया ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मेलानिया यांच्यावर नेमके आरोप आहेत तरी कोणते?
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण असताना मेलानिया यांनी घाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मेलानिया यांनी व्हाईट हाऊसमध्ये येत थेट हातातील निवेदन वाचण्यास सुरुवात केली.
“जेफ्री एपस्टीनवरुन करण्यात येणारे आरोप आजपासूनच थांबायला हवेत”, असे त्यांनी स्पष्ट केले. पण, कोणते आरोप याची माहिती त्यांनी दिली नाही. “एपस्टीनने केलेल्या अत्याचारांचा कल्पना नव्हती शिवाय मी पीडित देखील नाही. तसेच, त्याच्या खासगी बेटाला भेट दिली नाही किंवा विमानातून प्रवास केला नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मेलानिया यांच्यावर एपस्टीन यांच्यावरुन नव्याने कोणतेही मोठे आरोप अलिकडे करण्यात आलेले नाहीत. असे असताना त्यांना पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण देण्याची गरज का भासली असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अत्ताच का दिले स्पष्टीकरण?
इराणबरोबर भीषण संघर्षावर अद्याप तोडगा निघाला नसताना, देशात तणाव असताना मेलानिया यांनी एपस्टीनचा मुद्दा का उपस्थित केला असाही सवाल उपस्थित केला जात आहे. एपस्टीन प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी इराण युद्ध सुरु केल्याचा आरोप झाल्यानंतर आता युद्धावरुन लक्ष हटविण्यासाठी एपस्टीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करुन विचलित करण्याचा प्रयत्न होतोय का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
अनेक प्रश्न आणि भीती
एपस्टीनचा सहकारी घिनेल मॅक्सवेल याच्याकडे काही गुप्त माहिती असण्याची भीती मेलानिया यांना आहे. मॅक्सवेल काही धक्कादायक खुलासे करण्यापूर्वी भूमिका स्पष्ट करावी असाही उद्देश यामागे असू शकतो, असे या विषयातील जाणकार सांगत आहेत. याशिवाय पाल्म बाँडी यांच्याबाबतही मेलानिया साशंक असण्याची शक्यता आहे.
