चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याची जगभरात मोठी चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चेसह काही महित्वाचे निर्णय झाले आहेत. दरम्यान, शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प व अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांच्यातील एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान स्वागताच्या वेळी अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, मेलानिया ट्रम्प यांनी खरंच शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला का? याची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे?
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर शी जिनपिंग हे हस्तांदोलन करण्यासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या दिशेने सरकले. पण लगेच मेलानिया ट्रम्प यांनी आपला उजवा हात वर करून थांबण्याचा इशारा करत मागे सरकताना व्हिडीओत दिसत आहेत.
त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे शी जिनपिंग यांच्याबरोबर असलेल्या एका चिनी अधिकाऱ्याशी हस्तांदोलन करताना दिसतात. दरम्यान, मेलानिया ट्रम्प यांनी अशी कृती का केली? हे या व्हिडीओवरून स्पष्ट होत नाही. तसेच याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन देण्यात आलेलं नाही.
शर्यत लावू, कुस्ती नको! जिनपिंग यांचे आवाहन
‘चीन आणि अमेरिकेदरम्यान निरोगी स्पर्धा असावी, एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना नको’ असं आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान केलं. जिनपिंग अमेरिकेच्या शासकीय दौर्यावर असताना ट्रम्प यांनी त्यांचं विमानतळावर जाऊन स्वागत केलं. यावेळी जिनपिंग यांची पत्नी पेंग लिउयान आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प याही उपस्थित होत्या.
जिनपिंग २०१५ नंतर प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. जगातील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांच्या अध्यक्षांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, ‘एआय’, लष्करी संबंध, पश्चिम आशियातील तिढा, रशिया-युक्रेन युद्ध, शस्त्रास्त्र स्पर्धा, अमेरिकेकडून तैवानला शस्त्रांची विक्री यासह आदी विषयांवर महत्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
