तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्डोगन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणात काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षीही त्यांनी आमसभेच्या अधिवेशनात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा उल्लेख केला होता. 

भारताने त्या वेळी असे म्हटले होते, की जम्मू काश्मीर ही आमच्या देशाची अंतर्गत बाब असून इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यास इतर देशांनी शिकावे. एर्डोगन यांनी या वेळी आमसभेतील भाषणात सांगितले, की गेली ७४ वर्षे काश्मीरचा प्रश्न तसाच असून तो संबंधित देशांनी संवादाच्या माध्यमातून व संयुक्त राष्ट्र ठरावांच्या चौकटीत राहून सोडवण्याची गरज आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन हे पाकिस्तानचे मित्र समजले जातात. त्यांनी वेळोवेळी आमसभेमध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती त्या वेळीही त्यांनी जम्मू काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता.

भारताने त्या वेळी असे म्हटले होते, की एर्डोगन यांना इतिहास व राजनीतीचे ज्ञान नाही असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. एर्डोगन यांच्या वक्तव्याने तुर्कस्तान व भारत यांच्यातील संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवाद पसरवित असल्याच्या कृत्याचे एर्डोगन यांनी समर्थन केल्यासारखेच आहे, पण एर्डोगन यांच्या वक्तव्याला भारताने वेळोवेळी आक्षेप घेतले आहेत.

एर्डोगन यांनी मंगळवारी आमसभेतील भाषणात चीनमधील उगुर मुस्लीम अल्पसंख्याकांचा व म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्नही उपस्थित केला. एर्डोगन यांनी सांगितले, की शिनजियांग प्रांतातील उगुर मुस्लिमांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण केले पाहिजे. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा देशात सन्मानाने प्रवेश देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.