Indian sailors killed Father Shares Last Phone Call Details: ओमानच्या किनाऱ्याजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने नाकेबंदी केलेल्या भागात व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. यात २३ वर्षीय आदित्य शर्मा यांचा देखील मृत्यू झाला आहे. पालाऊच्या ध्वजाकिंत ‘एमटी सेटबेलो’ या अमेरिकडून वारंवार मिळणाऱ्या इशाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्वी परिस्थितीची माहिती भारतीय नाविक आदित्य शर्मा यांनी कुटुंबियांना दिली होती. आदित्य शर्मा यांनी याबाबत रविवारी फोनवर आपल्या वडिलांशी संवाद साधला होता, अशी माहिती समोर आली आहे. आदित्यचे वडील राजेश शर्मा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी वडिलांशी झालं होतं बोलणं

राजेश शर्मा म्हणाले की, “आमचे रोजच बोलणं व्हायचे. गेल्या पंधरवड्यात त्यांना अमेरिकन नौदलाकडून किमान दोनदा इशारा मिळाला होता, तरीही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे रविवारी व्हॉट्सॲप कॉलवर त्याने मला सांगितले. आम्ही खूप काळजीत होतो. त्याच दिवशी त्यांच्या जवळील दुसऱ्या एका जहाजावरही हल्ला झाला होता, पण त्या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आल्याचे सांगत त्याने आम्हाला धीर दिला.” ओमान किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या तीन भारतीय नाविकांपैकी ​२३ वर्षीय आदित्य शर्मा एक होते. जहाजावरील एकूण २४ भारतीय नाविकांपैकी २१ जणांना वाचवण्यात यश आले असून, तीन जण बेपत्ता होते.

गुरुवारी मिळाली निधनाची बातमी

होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेकडून नाकबंदी करण्यात आली आहे. ही नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ओमानच्या किनाऱ्याजवळ टँकरवर हल्ला करण्यात आला, असे स्पष्टीकरण ​अमेरिकन लष्कराने दिले आहे. या हल्ल्यात आदित्य शर्माचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी संबंधित जहाजाच्या कंपनीने आदित्यच्या निधनाची माहिती कुटुंबाला देण्यात आली. ​”त्याचा मृतदेह सापडला आहे की नाही, हे आम्हाला अद्याप माहित नाही,” असे राजेश शर्मा म्हणाले. अखेरच्या क्षणी नक्की काय घडले, हे मला जाणून घ्यायचे आहे, असेही शर्मा ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाले.

उच्च शिक्षणानंतर नोकरी

​पंजाबमधील जालंधर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदित्यने चेन्नईतील एका खाजगी विद्यापीठातून ‘नॉटिकल सायन्स’चे शिक्षण घेतले होते. त्याने ग्लासगो, स्कॉटलंड येथून नॉटिकल सायन्सचा डिप्लोमा देखील पूर्ण केला होता.​”आदित्य नोव्हेंबरमध्ये रुजू झाला, तेव्हा तिथं युद्धाची परिस्थिती नव्हती. जहाजाने यापूर्वी चीन-सिंगापूर मार्ग पूर्ण केला होता आणि आता ते ओमानकडे जात होते. तो मे महिन्यातच ओमानमधून आपली ड्युटी संपवून परतणार होता, परंतु नंतर त्याने आणखी दोन महिने थांबण्याचा निर्णय घेतला. तो डेक कॅडेट होता आणि कधीकधी वॉच टॉवरवर असायचा,” अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.

जबाबदार कोण? वडिलांचा सवाल

​”इतर दोन खलाशांचाही यात मृत्यू झाला आहे. तेही माझ्या मुलासारखेच होते. वारंवार इशारे मिळत असतानाही इतक्या लोकांचे आयुष्य धोक्यात का टाकले गेले, हे मला समजत नाही. आमच्या या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला.