पीटीआय, हैदराबाद, नवी दिल्ली

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान ‘मेटा’ कंपनीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील अनेक खात्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून अनेक संपादित प्रतिमा आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून हैदराबादच्या सायबर गुन्हे पोलिसांनी ही खाती आणि ‘मेटा इंडिया’च्या प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यासंबंधी २९ जुलैला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू झाली. तेलंगण भाजपचे समाजमाध्यम विभागाचे सदस्य टी साईकिरण गौड यांनी ही तक्रार नोंदवली होती. विरोधी पक्षांनी या आंदोलनाला निधी पुरवला असल्याचे गौड यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांची २३ जुलैची फेसबुक पोस्ट थोडा वेळ प्रतिबंधित केल्याच्या मुद्द्यावरून पाचारण करण्यात आलेल्या ‘मेटा’च्या जागतिक पथकाला अल्गोरिदमसंबंधी पूर्वग्रह, अल्गोरिदम कसे काम करते आणि सार्वजनिक सुव्यवस्थेमधील कंपनीची भूमिका याविषयी केंद्र सरकारकडून प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘मेटा’चे जागतिक पथक पुढील आठवड्यात भारतात येण्याची अपेक्षा आहे. या पथकाला संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले आहे. ‘पंतप्रधान मोदी यांची पोस्ट तांत्रिक अडचणींमुळे थोडा वेळ प्रतिबंधित झाली होती,’ असा खुलासा ‘मेटा’ने केला असला तरी त्यामुळे केंद्र सरकारचे समाधान झालेले नाही.