‘मेटा’ अर्थात पूर्वाश्रमीच्या फेसबुकने कर्मचारी कपातीची नवीन फेरी सुरू केली आहे. याचा परिणाम म्हणून कंपनीच्या जागतिक कर्मचार्यांपैकी सुमारे १० टक्के, म्हणजेच साधारणपणे ८,००० कर्मचार्यांना नारळ दिला जाईल. ‘मेटा’ने कर्मचार्यांना त्यांची नोकरी जात असल्याचे सूचित करण्यास सुरुवातही केली आहे. एकीकडे ‘मेटा’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखाली कंपनी या वर्षी कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

तर दुसरीकडे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, ‘मेटा’ने सिंगापूरच्या केंद्रातील प्रभावित कर्मचार्यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजता नोकरकपातीबाबत ईमेलद्वारे सूचित करण्यात आले. सुमारे ८,००० नोकर्यांच्या कपातीव्यतिरिक्त, कंपनी सुमारे ७,००० कर्मचार्यांचे नवीन ‘एआय-आधारित’ संघामध्ये पुनर्नियोजन देखील करणार आहे. व्यवस्थापकीय पदे कंपनीकडून कमी केले जात असून, त्याऐवजी लहान संघांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, असे ‘मेटा’च्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी जनेल गेल यांनी एका अंतर्गत परिपत्रकात म्हटले आहे.

कर्मचारी कपातीची ही फेरी प्रामुख्याने अभियांत्रिकी आणि उत्पादन संघावर परिणाम करेल, असे मानले जाते; तसेच वर्षाच्या उत्तरार्धात आणखी काही कर्मचारी कपात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ‘मेटा’ने संघटनात्मक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून सुमारे ६,००० रिक्त पदांची भरती प्रक्रियाही थांबवली आहे. सध्या ‘मेटा’मध्ये जागतिक पातळीवर ७८,००० कर्मचारी कार्यरत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ओरॅकलने देखील निवडक कर्मचार्यांना पहाटे ६ वाजता ईमेल पाठवून ही धक्कादायक गोष्ट सूचित केली होती.

जगभरातील सुमारे ३०,००० कर्मचार्यांची ओरॅकलने अशा तर्हेने कपात केली. ‘मेटा’ प्रभावित कर्मचार्यांना वेगवेगळ्या टप्प्यांत ईमेल धाडणार आहे आणि हे टप्पे संबंधित कर्मचार्यांच्या ‘काल क्षेत्रा’वर (टाइम झोन) अवलंबून असतील. कंपनीने अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांमधील कर्मचार्यांना कंपनीने घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्यासही सांगितले आहे.

‘मेटा’ व्यवस्थापनाने गेल्या महिन्यातच ८,००० नोकर्यांच्या कपातीला मंजुरी दिली आहे. मात्र या वृत्ताची माध्यमांमध्ये वाच्यता झाल्यानंतर, कर्मचार्यांमध्ये असुरक्षितता आणि चिंता निर्माण झाली, तसेच त्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ लागले आहे.

कर्मचारी कपातीची लाट

जागतिक पातळीवर अनेक तंत्रज्ञान कंपन्यादेखील ‘एआय’वर अधिक लक्ष केंद्रित करत असून नोकर्या कमी करत आहेत. सिस्कोने गेल्या आठवड्यात ४,००० पदे रद्द करण्याची घोषणा केली, तर मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि इतरांनीही अलीकडेच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे किंवा कर्मचार्यांना स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लिंक्डइनने विपणन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि इतर विभागांमधील ६०६ कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ही कपात १३ जुलैपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे.