सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे एका २५ वर्षीय तरुणाचे प्राण वाचल्याची थरारक आणि कौतुकास्पद घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. ब्रेकअपनंतर नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाचा पत्ता शोधून उत्तर प्रदेश पोलिसांनी अवघ्या ८ मिनिटांत त्याचे प्राण वाचवले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी ‘मेटा’ आणि यूपी पोलीस यांच्यातील आधुनिक समन्वय प्रणालीमुळे हा चमत्कार शक्य झाला आहे.

काय घडली नेमकी घटना?

मेरठमधील सरधना भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. या नैराश्यातून त्याने ७ जून रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ (रील) पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो एक पांढऱ्या रंगाचे विषारी द्रव प्राशन करताना दिसत होता आणि बॅकग्राउंडला “अब तुम खुश रहना अपनी लाइफ में” (आता तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा) असा भावनिक संदेश लिहिला होता.

‘मेटा’चा अलर्ट आणि पोलिसांची हायस्पीड अ‍ॅक्शन

तरुणाने हा व्हिडिओ पोस्ट करताच, ‘मेटा’ कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रणालीने संशयास्पद हालचाल ओळखून तात्काळ संध्याकाळी ६:५३ वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया सेंटरला ‘सुसाईड अलर्ट’ पाठवला.

मेटाकडून मिळालेला मोबाईल नंबर आणि लोकेशन ट्रॅक करून पोलीस महासंचालकांनी तात्काळ मेरठ पोलिसांना सतर्क केले. सरधना पोलीस स्टेशनचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ८ मिनिटांत तरुणाच्या घरी पोहोचले.

पोलीस जेव्हा पोहोचले, तेव्हा तो तरुण अत्यंत गंभीर अवस्थेत पडलेला होता आणि शेजारीच विषाची बाटली होती. पोलिसांनी वेळ न घालवता कुटुंबियांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने आता या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

समुपदेशन आणि भावनिक आधार

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणाची चौकशी केली. प्रेमसंबंध तुटल्यामुळे प्रचंड मानसिक तणाव आणि नैराश्यातून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने केवळ त्याचे प्राणच वाचवले नाहीत, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना आवश्यक ते मानसिक समुपदेशन करून जगण्याचा नवा धीर दिला.

३,०११ जणांना जीवदान! ‘मेटा’ अन् पोलिसांचे कवच

उत्तर प्रदेश पोलीस आणि मेटा कंपनी यांच्यात २०२२ पासून एक विशेष करार झाला आहे. याअंतर्गत फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर कोणीही आत्महत्येसारख्या स्वतःला इजा पोहचवणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर केल्यास, मेटा त्याचे थेट अलर्ट पोलिसांना पाठवते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२६ या साडेतीन वर्षांच्या काळात अशा ‘मेटा अलर्ट’वर त्वरित कारवाई करत पोलिसांनी तब्बल ३,०११ लोकांचे प्राण वाचवले आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास मानवी जीव वाचवता येतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.