मेक्सिकोत फुटबॉल वर्ल्डकप सुरू असताना एका महापौराच्या हत्येमुळे तणावाचं वातावरण आहे. मेक्सिकोतल्या ओक्साका राज्यातल्या सॅन मिग्युएल अॅमिटलान शहराच्या महापौरांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. देशात राजकीय हिंसाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

जोएल ब्राव्हो मार्टिनेझ यांची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. जीवाला धोका असून, मला संरक्षण पुरवण्यात यावं असं निवेदन त्यांनी दिलं होतं. नॅशनल अ‍ॅक्शन पार्टीने ही माहिती दिली.

हत्येची माहिती मिळताच ओक्साका राज्य यंत्रणेने उच्चपदस्थांच्या मृत्यूनंतर विशिष्ट शिष्टाचार लागू झाले आहेत. हत्येसाठी नेमकं कोण जबाबदार आहे याचा कसून शोध घेतला जात आहे असं मेक्सिकोच्या मंत्रिमंडळाने स्पष्ट केलं. हत्या झालेल्या परिसरात अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हत्येप्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मेक्सिकोतील राजकारण्यांना विविध टोळ्या लक्ष्य करत असतात. मेक्सिको फुटबॉल वर्ल्डकपचा सहयजमान आहे. देश सुरक्षित आणि आधुनिक आहे असा दावा मेक्सिकोच्या विविध यंत्रणांनी केला होता. मात्र महापौर पदावरील व्यक्तीच्या हत्येने हा दावा फोल ठरला आहे.

वर्ल्डकपच्या निमित्ताने मेक्सिकोत दाखल होणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्वतंत्र सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असल्याचं राष्ट्राध्यक्ष क्लॉडिआ शेइनबाऊम यांनी सांगितलं.