पीटीआय, नवी दिल्ली
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. वंदे मातरमवरून यापूर्वी कायदेमंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाद झाले आहेत. आता या नव्या निर्देशानंतर वाद होण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या आधी गायली जातील. राष्ट्रध्वज फडकावताना, सांस्कृतिक प्रसंगी किंवा संचलनाव्यतिरिक्त औपचारिक समारंभांमध्ये, सरकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या आगमनप्रसंगी राष्ट्रपतींचे आगमन आणि राज्यपालांची भाषणे यासारख्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’ गायले जाईल. याबरोबरच शाळांचे कामकाजही राष्ट्रीय गीत वाजवून सुरू होईल. मात्र, कोणकोणत्या प्रसंगी अधिकृत राष्ट्रीय गीत गायनास परवानगी दिली जाईल, त्याची संपूर्ण यादी देणे शक्य नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मातृभूमीला वंदन या भावनेतून हे गीत गायल्यास आणि योग्य शिष्टाचारांचे पालन केल्यास त्याच्या सामुदायिक गायनावर आक्षेप घेतला जाणार नाही, असे गृह खात्याने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय गीताचा कालावधी ३ मिनिटे १० सेकंद आहे. ज्या ठिकाणी ‘वंदे मातरम’चे गायन सुरू असेल तिथे उपस्थित श्रोते उभे राहतील. पण ते एखाद्या न्यूजरील किंवा माहितीपटात वाजवले जाईल तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहणे अपेक्षित नाही, अन्यथा त्यामुळे राष्ट्रीय गीताची प्रतिष्ठा वाढण्याऐवजी गोंधळ निर्माण होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय गीतासंबंधी सूचना
– राष्ट्रीय गीत वाजवले जात असताना पुरेशी सार्वजनिक ध्वनिव्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून उपस्थितांनाही एकसुरात गाता येईल.
– कार्यक्रमांमध्ये जनसमुदाय राष्ट्रीय गीत गात असताना त्याबरोबर अधिकृत गीत वाजवावे.
– गरज असल्यास अधिकृत राष्ट्रीय गीताच्या छापील प्रतींचे वाटप करावे.
वंदे मातरम आणि वाद
– ८ मे २०१३ रोजी लोकसभेत ‘वंदे मातरम’ वाजू लागल्यानंतर सर्व खासदार उठून उभे राहिले पण एक खासदार सभागृहातून बाहेर पडले. बसपचे खासदार शफीकूर रहमान बर्क असे त्यांचे नाव. त्यावर तत्कालीन लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार संतापल्या आणि त्यांनी कडक शब्दात समज दिली हाेती. त्यानंतर देशभरात वंदे मातरमवर चर्चा सुरू झाली. वंदे मातरम हे इस्लामविरोधी आहे, असे बर्क यांचे म्हणणे होते. गेल्या काही वर्षांत यावर अनेकदा चर्चा झाली आहे.
– राज्य सरकारने अलीकडेच शाळांमध्ये पूर्ण वंदे मातरम गायनाचा आदेश काढला आहे. या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांनी वंदे मातरम गायनाच्या या आदेशावर टीका केली. यावर मंत्री मंगलप्रभात लोढांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

