Satya Nadella Investment in India: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आशियातील ही आतापर्यंतची मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यांनतर त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत भारताच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात कंपनी १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.
आशिया खंडातील मायक्रोसॉफ्टची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यातून एआयसाठी पायाभूत सुविधा, कौशल्य निर्माण केले जाईल, असेही नाडेला यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल बोलताना सत्या नाडेला म्हणाले की, भारताच्या एआय क्षेत्रातील वाढत्या संधीबाबत आमच्यात अतिशय चांगली चर्चा झाली. याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.
भारताच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. भारताच्या एआय फर्स्ट भविष्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, कौशल्ये आणि स्वतःच्या अशा क्षमता निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक कामी येईल. ही आमची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे, असेही सत्या नाडेला यांनी म्हटले.
सत्या नाडेला यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनीही एक्सवर पोस्ट शेअर करत सत्या नाडेला यांना उत्तर दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा एआयचा विचार केला जातो, तेव्हा जग भारताबद्दल आशावादी असल्याचे दिसते. सत्या नाडेला यांच्याशी अतिशय चांगली चर्चा झाली. मायक्रोसॉफ्ट भारतात आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक करत आहे, हे पाहून आनंद झाला. भारतातील तरूण नक्कीच या संधीचा फायदा घेऊन नवे शोध लावतील. तसेच एआयचा वापर चांगल्या जगासाठी करतील.
सत्या नाडेला सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत पंतप्रधानांबरोबर बैठक झाल्यानंतर ते बंगळुरू आणि मुंबईला जाणार आहेत. भारतात मायक्रोसॉफ्टचा विस्तार करणे, तसेच क्लाउड आणि एआय क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार आहे.
यावर्षी जानेवारीमध्येही सत्या नाडेला यांनी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी क्लाउड, एआय पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. यासाठी दोन वर्षांहून अधिक काळासाठी त्यांनी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.
