नवी दिल्ली : वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मंगळवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर नाडेला यांनी हा निर्णय घेतला.
सत्या नाडेला यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन भारतातील एआयबाबतचा पथदर्शी आराखडा आणि विकासाच्या प्राधान्यांवर चर्चा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. ‘एक्स’वर माहिती देत ‘आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे,’ असे नाडेला यांनी सांगितले.
