पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीचा नागरी हवाई वाहतुकीलाही बसला असून अनेक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी पश्चिम आशियाला जाणारी-येणारी तसेच पश्चिम आशियातून जाणारी-येणारी हडजारो विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विविध विमानतळांवर लाखो प्रवासी अडकले आहेत. विमान कंपन्यांनी शक्य असेल तिथे विमानांचे मार्ग बदलले आहेत. यामुळे जगभरातील लोकांचे वेळापत्रक बिघडले आहे.

इराणने शनिवारी केलेल्या हल्ल्यांमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लक्षणीय नुकसान झाले. अबुधाबी आणि कुवेतच्या विमानतळांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई, अबुधाबी आणि कतारमधील दोहा ही विमानतळ एकतर पूर्ण बंद आहेत किंवा त्यांच्या कामकाजावर प्रचंड निर्बंध आले आहेत. दुबई आणि दोहाच्या विमानतळावरून पूर्व आणि पश्चिम जगाला जोडणारी विमान उड्डाणे होतात. तिथे आशिया आणि युरोपला जाणाऱ्या कनेक्टिंग विमानांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे हे युद्ध लांबले तर त्याचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘फ्लाइटअवेअर’ या विमानांचा माग घेणाऱ्या प्लॅटफॉर्मवर इराण, इराक, कुवेत, इस्रायल, बहारिन, यूएई आणि कतारची हवाई हद्द जवळपास रिकामी दिसली. या प्लॅटफॉर्मनुसार इराणची हवाई हद्द किमान ३ मार्चला दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हजारो विमानांचे उड्डाण रद्द झाल्यामुळे आशिया आणि युरोपमध्ये लाखो प्रवासी अडकून पडले आहेत. बालीमधील विमानतळावर लांब रांगा लागल्या आहेत. ढाक्यात प्रवासी पुढील माहिती प्रतीक्षा करत आपापल्या सामानावर बसले आहेत. काठमांडूच्या विमानतळामध्येही डिपार्चर बोर्डावर रद्द झालेल्या विमानांची मोठी यादी होती. पाकिस्तानने पश्चिम आशियाला जाणारी किमान १८४ विमाने रद्द केली आहेत.

विमान कंपन्यांपुढील आव्हान

बंद किंवा निर्बंधित हवाई हद्द टाळण्यासाठी युरोप, आशिया आणि पश्चिम आशियातील विमान कंपन्यांनी एकतर विमानांचे उड्डाण रद्द केले किंवा मार्ग बदलले. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च यामध्ये वाढ झाली. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे त्या भागातून उड्डाण करण्यास विमान कंपन्या उत्सुक नसतात. त्यात आता इराण आणि इराकच्या हवाई हद्दीची भर पडल्यामुळे विमान कंपन्यांपुढील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. इराणच्या जवळील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरू असल्यामुळे त्या भागातील हवाई हद्दही धोक्याचे असल्याचे ‘फ्लाइटट्रोड.२४’ चे संचालक इयान पेचेनिक यांनी सांगितले.

मुंबई, दिल्लीत २२५ विमाने रद्द

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून २२५ विमाने रद्द झाली. मुंबईमधून १२५ तर दिल्लीमधून १०० विमाने रद्द करावी लागली. मुंबईत रद्द झालेल्या विमानांपैकी ६७ विमाने उड्डाण करणार होती, तर ५८ विमाने लँडिंग करणार होती. तर दिल्लीत ६० विमानांचे उड्डाण आणि ४० विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आली, असे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सांगितले.