France President Emmanuel Macron on Iran war: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. या संभाषणाची माहिती मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. इराणने मध्यपूर्वेतील देशांवर थेट किंवा प्रॉक्सीद्वारे केले जाणारे हल्ले तात्काळ थांबवावेत, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी लेबनॉन आणि इराक यांचाही उल्लेख केला.

“फ्रान्सला लक्ष्य करणे अस्वीकार्य”

मॅक्रॉन यांनी सांगितले की फ्रान्स आपल्या हितसंबंधांचे, प्रादेशिक भागीदारांचे आणि जलवाहतूक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी कठोर संरक्षणात्मक चौकटीत काम करत आहे. “फ्रान्सला लक्ष्य करणे किंवा आमच्या हितांवर हल्ला करणे अस्वीकार्य आहे,” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.

दुबई विमानतळावर हल्ला

दरम्यान, गेल्या काही दिवसांत इराणकडून आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोमवारी (१६ मार्च) इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात हल्ला केल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर विमानतळावरील उड्डाण सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली.

याशिवाय, मॅक्रॉन यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्याची गरजही अधोरेखित केली. या सामुद्रधुनीत अनेक देशांची शेकडो जहाजे अडकून पडल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

अण्वस्त्रांवर भाष्य

फ्रेंच अध्यक्षांनी पुढे सांगितले की, इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि प्रादेशिक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन राजकीय आणि सुरक्षा चौकट आवश्यक आहे. “नवीन राजकीय आणि सुरक्षा चौकटच सर्वांसाठी दीर्घकालीन शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करू शकते. अशा व्यवस्थेमुळे इराण कधीही अण्वस्त्रे मिळवणार नाही याची हमी मिळाली पाहिजे,” असे मॅक्रॉन म्हणाले.

फ्रेंच नागरिकांच्या सुटकेचा मुद्दा

दरम्यान, या संभाषणादरम्यान मॅक्रॉन यांनी इराणमध्ये बंदिस्त असलेल्या दोन फ्रेंच नागरिकांच्या सुटकेचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सेसिल कोहलर आणि जॅक पॅरिस यांना शक्य तितक्या लवकर सुरक्षितपणे फ्रान्समध्ये परत पाठवण्याची विनंती इराणी अध्यक्षांकडे केली. “त्यांचे दुःख खूप दिवसांपासून सुरू आहे आणि त्यांची जागा त्यांच्या कुटुंबीयांसोबतच आहे,” असे मॅक्रॉन यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.