भारतीय हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान येथे कोसळले व वैमानिक सुरक्षितपणे बचावला. तथापि या अपघातात प्राणहानी झाली किंवा नाही हे समजू शकले नाही. वैमानिकाने सुरक्षितरीत्या बाहेर उडी घेतली असे संरक्षण खात्याच्या प्रवक्तयाने सांगितले. या विमानाचा वापर पायदळ हल्ल्यासाठी केला जातो.
जोधपूर येथील विमानतळावरून ते उडाले होते व ते राजस्थानातील उत्तरलाई हवाई दल स्थानकाकडे निघाले होते असे संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी सांगितले.
नेहमीच्या उड्डाणावर हे विमान होते. इतर हेलिकॉप्टर्स अपघातस्थळी मदतीकरिता पाठवण्यात आली आहेत. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बारमेर शहरापासून ८ कि.मी अंतरावर हा अपङात झाला त्यात एक मोटरसायकलस्वार जखमी झाला. बारमेर जिल्हा पश्चिम भागात असून पाकिस्तानला लागून आहे. दुपारी ३.१० वाजता हा अपघात झाला. वैमानिक सुखरूप बचावला पण एक मोटरसायकलस्वार जखमी झाला. त्याच्या अंगावर विमानाचा जळता भाग पडला.
महाबार खेडय़ात सेवकर रस्त्यावर ही घटना घडली. या जखमीचे नाव लून सिंग असे असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश संरक्षण खात्याच्या प्रवक्तयाने दिले आहेत.