भारतीय नौदलातील नव्या युगाचे अत्याधुनिक लढाऊ विमान असलेल्या मिग २९-के या विमानाचे आज संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या उपस्थितीत नौदलात कार्यान्वयन करण्यात आले. हे विमान आयएनएस विक्रमादित्य या नौदलाच्या युद्धनौकेशी संलग्न आहे, ही युद्धनौका मात्र या वर्षी उर्वरित काळात कार्यान्वित केली जाणार आहे. मिग २९ के स्क्वाडर्र्न या समूहात सोळा विमाने होती, आता त्याचे नामकरण ब्लॅक पँथर्स असे करण्यात आले आहे व नौदलात आता त्याचे नाव आयएनएएस ३०३ असे राहील. हे विमान फेब्रुवारी २०१०मध्ये नौदलात दाखल केले होते व त्यानंतर त्याच्या कठोर चाचण्या घेतल्यानंतरच ते कार्यान्वित करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमास सी हॅरीयर या आयएनएस विक्रांतवरील दोन लढाऊ विमानांनी मिग २९ के विमानांना साथसंगत केली. मिग २९ के हे विमान ताशी ८०० कि.मी. वेगाने उडाले.
याप्रसंगी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी सांगितले, की मिग २९ के या लढाऊ विमानांमुळे आता भारताची संरक्षण सिद्धता व युद्धक्षमता वाढली आहे. सागरी मार्ग हे आपले जीवनरेषा आहेत त्यामुळे शत्रूला त्यांच्याजवळही येऊ देता कामा नये. मिग २९ के या बहुउद्देशीय क्षमतेच्या विमानांमुळे आकाशावर आपले स्वामित्व असेल. नौदलाच्या हवाई विभागाने आत्मपरीक्षण करून आगामी काळासाठी योग्य असा कार्यक्रम आखला पाहिजे अशी अपेक्षा अँटनी यांनी व्यक्त केली. ब्लॅक पँथर स्क्वाडर्र्न हा विमानांचा काफिला आयएनएस विक्रमादित्यवरून काम करील. ही युद्धनौका वर्षअखेरीस कार्यान्वित केली जाणार आहे. विक्रमादित्यवरून लढाऊ विमान उडवणे हे खरे आव्हान आहे असे अँटनी म्हणाले.
या समारंभानंतर मिग २९ केची प्रतिकृती असलेल्या विमानातून अँटनी यांनी अर्धा तास प्रवास केला नंतर हे विमान विक्रमादित्य या युद्धनौकेवर उतरले. मिग २९ के या विमानातील शस्त्रांच्या खजिन्यात विमान विरोधी व जहाज विरोधी क्षेपणास्त्रे आहेत व अतिशय अचूक क्षमतेने टाकले जातील असे बॉम्ब व ते टाकण्याची यंत्रणा आहे.