लिबियाच्या किनाऱ्यावरून निघालेली २० मीटर लांब बोट उलटून ७०० लोक बुडून मरण भीती व्यक्त करण्यात आली असली तरी आतापर्यंत मृतांचा निश्चित आकडा २४ आहे, शेकडो निर्वासित बेपत्ता झाले असल्याची माहिती  द टाइम्स ऑफ माल्टा या वृत्तपत्राने दिली आहे.
या घटनेत २८ जणांना वाचवण्यात आले असून लिबियापासून दक्षिणेकडे, दक्षिण इटालीतील लॅम्पेडुसा या बेटावर ही दुर्घटना घडली. गेल्या आठवडय़ातही लिबियातून निघालेले ४०० लोक मरण पावले होते.
भूमध्यसागरात घडलेल्या शनिवारच्या दुर्घटनेत केवळ २८ जण वाचले आहेत. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कत यांनी मृतांचा आकडा ५० सांगितला आहे. पोप फ्रान्सिस यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून ते या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ही बोट भूमध्य सागरात पाच किलोमीटर तळाला गेली असून मृतदेह सापडण्याची शक्यताही कमीच आहे.
आताच्या घटनेत बोट उलटल्यानंतर लिबियाच्या निर्वासितांचा शोध घेण्यासाठी इटालियन तटरक्षक दल व नौदलाची जहाजे मदतकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. जर खरोखर या घटनेत ७०० लोक मरण पावले असतील तर दक्षिण मध्यसमुद्रात स्थलांतरित एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मरण पावल्याची ही एक भीषण घटना असेल, आतापर्यंत यावर्षी १५०० स्थलांतरित बुडून मरण पावले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्त कॅरलोटा सामीन यांनी सांगितले की, ही दुर्घटना आपण समजतो त्यापेक्षा जास्त भीषण आहे. स्काय टीडी २४ या वाहिनीला त्यांनी सांगितले की, लिबियातून येणाऱ्या निर्वासितांची अवस्था वाईट आहे. इटालियन तटरक्षक दलाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थलांतरित लोक बोटीत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ लागले तेव्हा तोल जाऊन बोट बुडाल्याचे सांगण्यात आले. इटलीच्या तटरक्षक दलाने आतापर्यंत ११००० स्थलांतरितांना वाचवले आहे.