देशात मॉब लिंचींगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. केवळ संशयातून जमावाने केलेल्या मारहाणीत अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका बांगडीवाल्याला जमावाने मारहाण केल्याची घटना ताजीच असताना अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. चोर असल्याच्या संशयातून जमावानं मारहाण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुळचा पश्चिम बंगालमधील हा तरुण नागपूरमध्ये काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच घरी परतला होता. तरुणाचे हात-पाय बांधून त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. प्रताप मोंडल असं मृत तरुणाचं नाव आहे.

मृत २४ वर्षीय प्रताप मोंडल हा नागपूरहून मालदा जिल्ह्यात घरी परतला होता. त्याला चोर असल्याचा संशयातून जमावाने मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. हरिश्चंद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पिपुलताळा गावातील लोकांच्या जमावाने प्रताप मंडलला पकडले, त्याचे हात व पाय दोरीने आणि लोखंडी साखळीने बांधले आणि शुक्रवारी रात्री त्याला जबर मारहाण केली. न्यूज १८ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

प्रताप हा मालिओर गावातील रहिवासी होता. मारहाणीनंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्याला चाचल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. हरिश्चंद्रपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजयकुमार दास म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना सोडले जाणार नाही. मृत प्रतापची आई संजू मोंडलने आपला मुलगा चोर नसून त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.