काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर गुरूवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सध्या भारतीय सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पहाटेच्या वेळेत ग्रेनेड आणि स्वयंचलित बंदुकांसह पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यानंतर पोलिसांनीही दहशतवाद्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. सध्या दोन्ही बाजुंकडून गोळीबार सुरू आहे. या चकमकीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रादेशिक नेत्याच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकाडून शस्त्र हिसकावून घेतल्याची घटना घडल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काल उत्तर काश्मीरमधील हंडवारा परिसरात बुधवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. भारतीय जवानांचा ताफा कुपवाड्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. श्रीनगरपासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर असलेल्या लंगेट येथून जात असताना कालगुंड गावाजवळ दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. बेछूट गोळीबार करून दहशतवादी पसार झाले. भारतीय लष्कराच्या ताफ्यावर गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तुकड्या दिवसाउजेडी एका ठिकाणहून दुसऱ्याठिकाणी ये-जा करत असत. मात्र, बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर लष्करी ताफ्यांची वाहतूक पुन्हा रात्रीच्या वेळेस सुरू झाली होती.