सुन्नी दहशतवाद्यांनी सीमावर्ती भागातील इराकी सैन्याच्या लष्करी ठाण्यावर कब्जा मिळवल्याची माहिती इराकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. या चकमकीत इराकी सैन्याच्या जवळपास ३० तुकड्यांमधील जवान मृत्युमूखी पडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बगदादपासून ३२० कि.मी. अंतरावर असणाऱ्या क्वेम या गावात इराकी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये दिवसभर तुंबळ धुमश्चक्री सुरू होती. सुन्नी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी आणून इराकमधील दुसरे सर्वात मोठे शहर मोसूल येथे याच महिन्यात कब्जा केला होता. त्यात एका बांधकाम कंपनीत काम करत असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी एक जण त्यांच्या तावडीतून पळाला असून तो बगदादमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे, असे परराष्ट्र खात्याचे सय्यद अकबर उद्दीन यांनी सांगितले आहे. अपहरण करण्यात आलेले कामगार सुरक्षित असून आम्ही अतिरेक्यांशी सर्व प्रकारे वाटाघाटीचे मार्ग अवलंबित आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, १६ भारतीयांना इराकमधून हलवण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.