घुसखोरीच्या चर्चेतील मेंढर तालुक्यातील चित्र बदलतेय

पाकव्याप्त काश्मिरात होणारे घुसखोरीचे प्रयत्न आणि ते प्रयत्न हाणून पाडण्याच्या घटनांनी सर्वाधिक चर्चेत असलेल्या मेंढर तालुक्यात भारतीय लष्काराने लगाम लावतानाच ऑपरेशन सद्भावना अंर्तगत विविध उपक्रम राबवून असून मेंढर तालुक्यातील बऱ्याचशा गावात शांतता निर्माण केली आहे. सोबतच सीमा भागातील युवकांना केवळ शेती आणि मेंढपाळीचा व्यवसायावर अवलंबून राहावे लागणाऱ्या युवकांना राज्य पोलीस आणि सशस्त्र दलात जाता यावे म्हणून पूर्व-प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. यामुळे या भागातील युवकांचे भविष्य घडवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील जम्मू विभाग घुसखोरीच्या घटनांसाठी मेंढर तालुकाच्या अग्रक्रम लागतो. यासाठी हा तालुका कायम चर्चेत असतो, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून सैन्यदलाने नवीन उपक्रम राबवून नियंत्रण रेषेलगतच्या गावातील युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन उघडले आहे. नियंत्रण रेषेपासून जवळच नागमोडी रस्ता आणि त्या लगतच्या एका छोटय़ा टेकडीवर साब्रा येथे सैन्यदलाने भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र दोन महिन्यापूर्वी सुरू केले. त्यातून २० युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातील काही मुलांनी जम्मू-काश्मीर पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तर काहींनी टेरिटोरिअल आर्मीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुळे मेंढर तालुका पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चा आहे ती या भागातील युवकांसाठी निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधीसाठी. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी साब्रा येथील विद्यालयाजवळ बॉम्बहल्ले झाल्याने काही दिवस शाळा बंद ठेवावी लागली होती. या भागात स्थानिक प्रशासन पोहचत नाही. या भागातील लोकांचे जीवन सैन्यदलावर अवलंबून आहे, असे ढेरी येथील सरपंच म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या काटेरी कुंपणाला (एआयओएस) लागूनच सैन्यदलाच्या मेंढर बटालियनने सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उघडले आहे. यामुळे गावातील युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ते आता भारतीय सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्कर व इतर सशस्त्र दलात सामील होण्याची तयारी करत आहेत.

घुसखोरी रोखण्यासाठी असलेल्या कुंपणाला लागून साब्रा येथील पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. त्यात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. कुंपणाशेजारीच शारीरिक चाचणीची तयारी करण्यासाठी प्रशिक्षण मैदान आहे. येथीला प्रशिक्षणामुळे बालकोट येथील मोहम्मद शाबीर या २२ वर्षीय युवकाने टेरिटोरिअल आर्मीची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तो आनंदी आहे. तो म्हणाला, माझी वैद्यकीय चाचणी झाली आणि मी निवड यादीची प्रतीक्षा करत आहे. या प्रशिक्षणामुळे माझे आयुष्य बदलले आहे. बालकोटमधील आणखी एक युवक औरंगजेब मिर यांनी भारतीय सैन्यदालाचे आभार मानले. तो म्हणाला, सैन्यदल पूर्व भरती प्रशिक्षण देत आहेत. येथे उच्च दर्जाच्या सुविधा आणि व्यावसायिक निदेशक आहेत. दूरवरून येणाऱ्या युवकांची सैन्यदल सर्व सोय करत असल्याने अत्यंत दुर्गम भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

युवापिढी देशाची संपत्ती

मेंढर तालुक्यातील या भागात होणारी घुसखोरी कुंपणामुळे कमी झाली आहे. दहशतवाद्यांच्या वारंवारच्या कुरापतींचा युवकांच्या शिक्षणांवर परिणाम होत होता. त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य परसले होते. भावी पिढीचे त्यांच्या भविष्य अंधकारमय होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. युवक आता लेखी परीक्षा उत्तीर्ण करण्याची तयारी करू लागले आहेत. सोबतच त्यांना शारीरिक चाचणीतही उत्तीर्ण होण्याचे धडे दिले जात आहेत. सैन्यदलाचे अधिकारी युवकांना लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमतेसाठी सज्ज करत आहेत. याविषयी बोलताना मेंढर बटालियचे कमांडर म्हणाले, देशाच्या या युवा संपत्तीला प्रशिक्षण देऊन सशस्त्र दलात आणण्याचे प्रयत्न आहेत.