गोव्यात आलिशान कार अशी ओळख असलेल्या मिनी कूपरने एका मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दिक्षा परवडकर या २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा सहकारी डी अरुणकुमार हा गंभीर जखमी झाला. गोवा पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका उद्योजकाचा मुलगा ही लक्झरी कार चालवत होता. भरधाव वेगात आलेल्या कारने बाईकला धडक दिली. ज्यात २३ वर्षीय दिक्षाचा मृत्यू झाला.
नेमकी घटना काय घडली?
दिक्षा परवडकर ही तरुणी तिचा सहकारी अरुणकुमारसह बाईकवरुन घरी परतत होती. दोघांची नाईट शिफ्ट संपली होती आणि ते घरी जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या मिनी कूपर कारने त्यांच्या बाईकला धडक दिली. दिक्षा आणि अरुण कुमार या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण दिक्षाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. २६ वर्षीय अरुण कुमार ची प्रकृती गंभीर आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं.
अपघात प्रकरणात २२ वर्षांच्या मुलाला अटक
गोवा पोलिसांनी या प्रकरणात डेरियस डायस या २२ वर्षांच्या मुलाला अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा पणजीतल्या दोना पाऊला भागात हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. डेरियस डायस ही मिनी कूपर चालवत होता, त्याने मोटरसायकलला धडक दिली. या कारवर तात्पुरती नंबर प्लेट लावली होती. या कारची नोंदणी वाहतूक विभागाकडे व्हायची होती. त्याआधीच हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितलं की डी अरुण कुमार गाडी चालवत होता. त्याच्या मागे दिक्षा परवडकर बसली होती. दोघंही पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होते. या प्रकरणी आता पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं.
प्राथमिक तपासात ही बाब समोर आली आहे की कार प्रचंड वेगात होती. चालकाचं कारवर नियंत्रणच राहिलं नाही त्यामुळे ही कार बाईकला धडकली. या अपघातानंतर त्या भागात एकच गोंधळ उडाला. लोकांनी तातडीने जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केली. दिक्षाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर अरुण कुमार जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता पोलीस हा तपास करत आहेत की आरोपी दारु प्यायला होता का? तसंच कारचा वेग नेमका किती होता? बेदरकारपणे कार चालवण्याची ही घटना समोर आली आहे.
