बँक खात्यात किमान रक्कम न ठेवण्याच्या एका चुकीचा फटका अनेक ग्राहकांना बसला असून यामुळे बँका मात्र मालामाल झाल्या आहेत. अशा ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या वित्तीय वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा दंड वसूल केला आहे. यापैकी एकट्या एसबीआयने तब्बल २ हजार ४३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तब्बल २१ सरकारी आणि ३ मोठय़ा खासगी बँकांनी खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला. एसबीआयनंतर एचडीएफसी बँकेने आपल्या खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर दंड वसूल केला आहे. एचडीएफसीने अशा ग्राहकांकडून ५९० कोटी रुपये दंड वसूल केला असून ही रक्कम मागीलवर्षीच्या ६१९ कोटी रकमेपेक्षा कमी आहे. एचडीएफसीपाठोपाठ ऍक्सीस बँकेने ग्राहकांकडून ५३० कोटी रुपयांचा तर आयसीआयसीआय बँकेने ३१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.अशाप्रकारे एकूण २४ बँकांनी दंडापोटी ग्राहकांकडून तब्बल ५ हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे.

काय आहे नियम-
नव्या नियमानुसार मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या एसबीआयच्या खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम ३ हजार रुपये ठेवणं आवश्यक आहे. जर खात्यात २ हजार ९९९ ते १५०० रुपये किमान रक्कम असेल तर एसबीआय ३० रुपये दंड आकारतं. तर, किमान रक्कम १४९९ ते ७५० रुपयांपर्यंत असेल तर एसबीआय खातेदारांकडून ४० ते ५० रुपये दंड आकारतं.