scorecardresearch

जयशंकर यांची मालदीव, श्रीलंकेसाठी ‘सागर-शेजारधर्म’ मोहीम; द्विपक्षीय सहकार्य आणि अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

जयशंकर यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात  भारताचे योगदान असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील.

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर शनिवारपासून मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने  शनिवारी दिली.

जयशंकर या दौऱ्यात मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतील आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करतील.

जयशंकर यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात  भारताचे योगदान असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. तसेच दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. त्यात मालदीवचा विकास आणि त्याचे संरक्षण यावर अधिक भर असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर २८ मार्च ते ३० मार्च या कालावधीत श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंका आर्थिक संकटात असून त्याला तोंड देण्यासाठी भारताने त्या देशाला एक अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर एक आठवडय़ानेच जयशंकर दौऱ्यावर जात आहेत.

श्रीलंकेचे अर्थमंत्री बसिल राजपक्षे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि परराष्ट्रमंत्री जी. एल. पेरीस यांनी गेल्या फेब्रुवारीत भारताला भेट दिली होती. या दोन मंत्र्यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा श्रीलंका दौरा महत्त्वाचा मानला जातो. श्रीलंका भेटीत जयशंकर ज्या द्विपक्षीय बैठका घेतील आणि चर्चा करतील त्यातून भारताबाबतचा श्रीलंकेचा प्राधान्यक्रम अधोरेखित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

जयशंकर २९ मार्चला कोलंबो येथे बिम्स्टेक (बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह) या मंत्रिस्तरीय बैठकीतही सहभागी होतील. मालदीव आणि श्रीलंका हे दोन्ही हिंदू महासागर क्षेत्रातील भारताचे प्रमुख शेजारी आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेत ‘‘सागर’ आणि शेजारधर्म प्रथम’ यांना विशेष स्थान आहे, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नमूद केले आहे.

 मालदीव आणि श्रीलंका यांच्याशी असलेल्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना भारत किती महत्त्व देतो याची साक्ष परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौऱ्यातून पटते, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minister of foreign affairs visit to sri lanka financial crisis akp

ताज्या बातम्या