Piyush Goyal on NCP President: अजित पवारांच्या अपघातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. कारण शनिवारी (३१ जानेवारी) सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर पटेल यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या बातमीनंतर मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर ट्विट करत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली नसल्याचे स्पष्ट केले. पीयूष गोयल यांनीही ट्विटवरून माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पक्षाचे नेते काय म्हणाले?

पीयूष गोयल यांनी मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली नाही. माध्यमांत आलेली माहिती चुकीची आहे. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते मिळून अध्यपदाच्या निवडीचा निर्णय घेणार आहोत’. तसेच आमदार अमोल मिटकरी यांनीही या बातमीचे खंडन केले होते. ‘पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अशा अफवा पसरवणे हे पूर्णपणे राजकीय हेतूने केले जात आहे. जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

“त्या माहितीबद्दल मी माफी मागतो…”

भाजपा नेते पीयूष गोयल यांना त्यांची चूक समजल्यावर त्यांनी सोशल मीडियावर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केले. ते म्हणाले, ‘प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत अशी चुकीची माहिती एका ज्येष्ठ पत्रकाराने मला दिली होती. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांमध्ये काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो’.

पक्षाचा अध्यक्ष कसा निवडला जाणार?

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना त्यांचे विमान कोसळले आणि या भीषण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी (३१ जानेवारी) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आता पक्षाचा अध्यक्ष कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या एका वक्तव्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत आपण अध्यक्षपदी निवडले गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड ही पक्षातील वरिष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकमतानेच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.