India On Israel Iran War : इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला. त्यामुळे इराणने संतप्त होत अमेरिका आणि इस्त्रायलवर खूप मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुन्हा धमकी देत इराणवर अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील या युद्धाचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील या संघर्षावर भारताने प्रतिक्रिया जारी करत शांतता राखण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं व संवाद व राजनैतिकतेद्वारे तणाव सोडवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला असन दोन्ही देशाला संवाद आणि राजनैतिकतेचं आवाहन केलं आहे. याबाबतची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली. मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, “इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकचं आवाहन केलं. तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली.”
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
“आम्ही सर्व बाजूंना संयम बाळगण्याचं, संघर्ष टाळण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन करतो. तणाव कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्ग अवलंबला पाहिजे. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे”, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
Our statement on the evolving situation in West Asia ⬇️
— Randhir Jaiswal (@MEAIndia) February 28, 2026
? https://t.co/6aGR3mdDrb pic.twitter.com/qdKlTorVU4
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा मोठा इशारा
इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
