S Jaishankar : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. एवढंच नाही तर भारताने सिंधू पाणी करारही स्थगित करण्यासह आणखी काही मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे.
पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिला आहे. दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत प्रत्युत्तर देईल, असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.’पाकिस्तानात दहशतवादी कितीही आत असले तरी भारत प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही’, असं एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
मंत्री एस जयशंकर काय म्हणाले?
“भविष्यात पाकिस्तानने अशा प्रकराच्या दहशतवादी कारवाया किंवा कुरापती करण्याचा प्रयत्न केल्यास भारत कोणत्याही स्थानाची किंवा ते पाकिस्तानात कुठे आहेत याची पर्वा करणार नाही. मग ते पाकिस्तानात कितीही आतमध्ये असतील तरी आम्ही आत घुसून प्रत्युत्तर देऊ”, असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
मंत्री एस जयशंकर पुढे म्हणाले की, “पाकिस्तान हा एक असा देश आहे जो दहशतवादाचा वापर देशाच्या धोरणाचं साधन म्हणून करत आहे. हाच मोठा मुद्दा आहे. मात्र, जर दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तराला त्यांनी तणावाचं कारण म्हटलं तर हे आम्ही सहन करणार नाही”, असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं.
तसेच यावेळी एस जयशंकर यांनी असंही अधोरेखित केलं की भारताच्या ऑपरेश सिंदूरच्या कारवाईत लढाऊ विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई दलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळे पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी हात पुढे करावे लागले. पाकिस्तान आणि भारतातील तणावानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने विनंती केल्यानंतर १० मे रोजी लष्करी संघर्ष थांबल्याचं मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं.