MEA spokesperson Randhir Jaiswal on Lalit Modi and Vijay Mallya Video : आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी स्वतःचा आणि विजय मुल्ल्या यांचा उल्लेख ‘भारतातील दोन सर्वात मोठे फरार’ असा उल्लेख केल्याच्या लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालायाने प्रतिक्रिया दिली आहे. साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फरार असलेल्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी राजनैतिक आणि कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

“जे लोक फरार आहेत आणि कायद्यानुसार भारताला हवे आहेत, त्यांना देशात परत आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. या विशिष्ट प्रकरणात परत आणण्यासाठी आम्ही अनेक देशांच्या सरकारांशी चर्चा करत आहोत आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत.

त्यांनी नमूद केले की अशा प्रकरणांमध्ये विविध अधिकार क्षेत्रांमध्ये गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियाचा समावेश असतो पण त्यांनी अधोरेखित केले की भारताची भूमिका ठाम आहे. “जसे की तुम्हाला माहिती आहे, अशा बहुतांश प्रकरणांमध्ये, कायदेशीर बाबींचे अनेक स्तर असतात, परंतु आम्ही त्यांना देशात परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत जेणेकरून त्यांना येछे न्यायालयासमोर खटल्यांना सामोरे जावे लागेल.”

नेमकं प्रकरण काय आहे?

ललित मोदी यांनी लंडनमधील मल्ल्या यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. (आता हा व्हिडीओ हटवला गेला आहे) त्यानंतर काही दिवसांनी परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडीओमध्ये ललित मोदी हे विजय मल्ल्या यांच्या बरोबर मिळून “आम्ही दोघे भारतातील सर्वात मोठी फरार लोक आहोत”, असे ते दुसर्‍या एका व्यक्तीला सांगताना दिसत आहे. ललित मोदी यांनी हे गमतीने म्हटले असले तरी त्यांनी व्हिडीओला जे कॅप्शन दिले आहे, त्यावरून ते भारताची टिंगल उडवत आहेत, असा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला होता.

ललित मोदी यांनी स्वतःची आणि विजय मल्ल्या यांची ओळख उपहासात्मक पद्धतीने एका विदेशी व्यक्तीला करून दिल्याचे या व्हिडीओतून दिसत होते. मात्र हे सांगत असताना त्यांचे हावभाव आणि त्यानंतर दोघांचेही कुत्सित हास्य यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका केली गेली. ‘चला भारतातील इंटरनेट पुन्हा एकदा बंद पाडूया’, असे कॅप्शन ललित मोदी यांनी व्हिडीओला दिले होते.

ललीत मोदींनी लंडनमधील बेलग्रेव्ह स्क्वेअर येथील त्यांच्या सहा बेडरूमच्या घरात मुल्ल्या यांचा वाढदिवस साजरा केला. मल्ल्या यांचे अनेक सहकारी या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी भारतातून गेल्याचे वृत्त आहे.

ललित मोदींवर काय आरोप आहेत?

ललित मोदींनी यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ललित मोदींना बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आलं होतं. आयपीएलच्या २०१० मधील स्पर्धेनंतर त्यांनी देश सोडला होता. तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं जात आहे.

विजय मल्ल्यांवर कोणते आरोप आहेत?

ईडीने आरोप केल्यानुसार, विजय मल्ल्या यांनी बँकांची ६,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर व्याजासह सुमारे १५,००० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांची १४,०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंगच्या तपासासाठी भारतीय तपास यंत्रणांना त्यांचे प्रत्यार्पण हवे आहे. मात्र यूकेमध्ये राहणारे मल्ल्या प्रत्यार्पणाला आव्हान देत आहेत.