देशाची धर्मनिरपेक्ष रचना कमकुवत करण्याचे किंवा धार्मिक भावना भडकावण्याचे कुठलेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, याची जाणीव करून देऊन दादरीसारख्या घटनांमध्ये कायद्यानुसार शक्य तितकी कठोर कारवाई करावी, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. देशातील धार्मिक शांतता भंग करणाऱ्या घटनांबद्दल मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
अल्पसंख्याक व्यवहारमंत्री नजमा हेपतुल्ला आणि या खात्याचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सरकारचा विकासाचा कार्यक्रम विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा:दादरी घटनेवरून राजकीय चिखलफेक तीव्र

दादरीच्या घटनेसाठी जो कुणी जबाबदार असेल, त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे हेपतुल्ला यांनी म्हटले आहे. तर सरकारच्या विकासाभिमुख कार्यक्रमावर आक्रमण करणारा कोणताही विनाशक कारस्थान अमलात आणला जाऊ दिला जाणार नाही, असा इशारा नक्वी यांनी दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला, तरी दादरीतील घटनेसह धार्मिक अशांतता पसरवणाऱ्या देशभरातील घटनांबाबत गृहमंत्रालयाने एका निवेदनात चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार मंत्रालयाने राज्य सरकारांसाठी एक पत्र जारी केले आहे. राज्यांनी कुठलाही अपवाद न करता विध्वंसक घटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने दादरी घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला होता, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासही सांगितले होते, असेही या पत्रात म्हटले आहे.

भाजपचे आमदार संगीत सोम यांनी बिसारा खेडय़ाला दिलेल्या भेटीचे व्हिडीओ चित्रीकरण तपासत असल्याचे गौतमबुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने सोमवारी सांगितले. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल व शिवम या दोन आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणीही दादरी पोलिसांनी केली आहे. अखलाकच्या हत्येला कारणीभूत ठरलेली गोहत्येची अफवा पसरवल्याच्या संशयावरून या दोघांना अटक झाली होती.

सरकारच्या विकासाभिमुख कार्यक्रमावर आक्रमण करणारा कोणताही विनाशक कारस्थान अमलात आणला जाऊ दिला जाणार नाही. धार्मिक तेढ पसरविणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
– मुख्तार अब्बास नक्वी, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of home affairs asks all states to ensure zero tolerance towards any attempt to incite communal tension
First published on: 06-10-2015 at 01:44 IST