ऑनलाईन गेमिंगच्या वेडाने घेतला जीव; सहावीतला विद्यार्थी ४० हजार हरला, नंतर…

ऑनलाइन गेममध्ये ४० हजार रुपये हरल्यानंतर आत्महत्या करत असल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहून शाळकरी मुलानं आत्महत्या केली आहे.

crime news, suicide
ऑनलाइन गेमिंगमध्ये ४० हजार रुपये हरल्यामुळे ६ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! (प्रातिनिधीक छायाचित्र)

करोना आणि लॉकडाऊनमुळे मुलं घरीच आहेत. शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यानं पालकांनी मुलांना मोबाईल, लॅपटॉप घेऊन दिलेत. मुलं मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर अभ्यासा व्यतिरिक्त गेम खेळण्यासाठी करत असतात. अनेकदा मुलं ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन काहीतरी करून बसतात, तर अनेक मुलं जीव गमावून बसतात. अशीच एक घटना मध्य प्रदेश मधील छत्तरपूरमधून समोर आली आहे. इथं एका १३ वर्षीय मुलानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. ऑनलाइन गेममध्ये ४० हजार रुपये हरल्यानंतर आत्महत्या करत असल्याचं या मुलानं सुसाइड नोटमध्ये म्हटलंय.

या घटनेबद्दल पोलीस उपअधीक्षक शशांक जैन यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “या अल्पवयीन मुलाने सुसाईड नोट लिहून छत्तरपूरमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हा मुलगा सहाव्या वर्गात शिकत होता. या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. त्याची आई नर्स असून ती रुग्णालयात कामावर गेली होती. तर वडील देखील कामानिमित्त घराबाहेर होते. मुलाच्या आईला तिच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज मिळाल्यानंतर तिने मुलाला फोन केला आणि रागावली. त्यानंतर मुलाने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला आवाज दिला. मात्र, तो खोलीचं दार उघडत नव्हता. मुलीने याबद्दल पालकांना सांगितलं. पालक घरी आल्यानंतर त्यांनी दार तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मुलाने स्कार्फच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला होता.”

बिहारमध्ये दोन मुलांचा आत्महत्येचा प्रयत्न..

नुकतीच बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. वडिलांनी गेम खेळण्यापासून रोखल्यामुळे दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांना वेळीच लक्षात आल्यामुळे या मुलांचा जीव वाचला होता.

पोलिसांचं पालकांना आवाहन..

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय. सध्या ऑनलाइन अभ्यास सुरू असल्याने पालकांनी मुलं अभ्यासाव्यतिरिक्त फोनचा वापर कशासाठी करतात, यावर लक्ष ठेवायला हवं असं ते म्हणालेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor boy dies by suicide after losing money in online game in madhya pradesh hrc

ताज्या बातम्या