भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्ती महासंघातील अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. या अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतल्याचे वृत्त व्हायरल झाले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंहला दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. जनसत्ता संकेतस्थळाने आयएएनएसच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची तक्रार दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवली होती. यामध्ये तिने ब्रिजभूषणविरोधात अनेक आरोप केले होते. परंतु, हे आरोप तिने २ जून रोजी मागे घेतले असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं आहे. तसंच, अल्पवयीन मुलगी तक्रार मागे घेताना तिचे वडील आणि आजोबाही उपस्थित होते, असंही म्हटलं गेलं. याबाबत तिच्या वडिलांनी खुलासा केला आहे.




अल्पवयीन मुलीचे वडील काय म्हणाले?
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, “आम्ही नोंदवलेल्या जबाबावर आम्ही आजही ठाम आहोत. मी सध्या हरियाणा येथे आहे, दिल्लीत नाही.” अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्याने ब्रिजभूषण यांच्यविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. म्हणून ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी महिला कुस्तीपटूंनी सातत्याने केली आहे.
कसा झाला होता अत्याचार?
अल्पवयीन मुलीच्या वडिलाने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “मुलीने वयाच्या १६ व्या वर्षी झारखंडच्या रांची येथे नॅशनल गेम्समध्ये ज्युनिअर रेसलिंग चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. येथेच फोटो घेण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषणने मुलीला जवळ ओढलं होतं. तिला जवळ ओढल्यानंतर ब्रिजभूषणने तिच्या कंबरेखाली हात ठेवला होता. तसंच, तू मला सहकार्य कर, मग मी तुला सहकार्य करेन असंही ब्रिजभूषण पीडिला मुलीला म्हणाला होता.” एफआयआरमध्येही अशीच तक्रार नोंदवण्यात आली होती.
हेही वाचा >> कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतली? साक्षी मलिक खुलासा करत म्हणाली…
साक्षी मलिकचीही माघार?
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही या आंदोलनातून माघार घेतली असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. तसंच, ती तिच्या रेल्वेतील नोकरीत पुन्हा रुजू झाल्याचेही समोर आले होते. परंतु, हे वृत्त पसरताच साक्षी मलिकने याबाबत खुलासा केला. “ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका, असं आवाहन साक्षी मलिकने केलं आहे.
“आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांना ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी केली. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच, मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही चुकीचं आहे,” असं साक्षी मलिकने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.