भारतीय नौदलाच्या विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. ही आग अगदीच छोट्या स्वरुपाची होती. या आगीमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. यासंदर्भातील माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनीच दिलीय. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. सध्या आयएनएस विक्रमादित्य कारवारच्या बंदरामध्ये आहे.

आयएनएस विक्रमादित्यच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणाऱ्यांची राहण्याची सोय असणाऱ्या भागामध्ये आग लागली. या भागामधून आग आणि धूर बाहेर येऊ लागल्यानंतर फायर फायटिंग ऑप्रेशन लॉन्च करण्यात आलं. तातडीने ही आग विझवण्यात आली. नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली असून नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

“ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना युद्ध विमानाच्या सैनिकांच्या राहण्यासाठी राखीव असलेल्या भागातून धूर येताना दिसला. त्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मोजणी करण्यात आली. कोणतेही मोठे नुकसान झालेलं नाही,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून हे जहाज सध्या बंदरावर असल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

कीव क्लास दर्जाचे हे विमानवाहक जहाज भारताने रशियाकडून २०१३ साली विकत घेतलं आहे. बाकू नावाने तयार करण्यात आलेली अशापद्धतीचं जहाजं १९९६ पर्यंत सोव्हिएत युनियन आणि रशियन नौदलामध्ये होती. जास्त खर्चिक असल्याने ही जहाजं रशियाने नौदालातून काही काळ काढून टाकली होती. तीन फुटबॉल मैदानांएवढा आकार असणारं हे जहाज आहे.