Gujarat Minor Girl Gangrape: गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी (७ जानेवारी) रात्री प्रात:र्विधीसाठी घराबाहेर पडली. त्यावेळी तीन तरूणांनी तिचे अपहरण केले. तिला गावापासून तीन किलोमीटर दूर नेले. त्यानंतर तिथे आणखी पाच जण आले. त्यानंतर नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक केली असून आरोपी १६ ते २१ या वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडियाने’ याबाबत वृत्त दिले आहे.

नवसारी जिल्ह्यातील वंसदा गावात ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री आठ वाजता अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील सदस्य झोपी गेल्यानंतर ती प्रात:र्विधीसाठी घराबाहेर पडली. त्यावेळी तिघांनी तिचे अपहरण केले. तिला गावापासून तीन किमी दूर नेले. एका पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या खोलीत तिला नेण्यात आले. त्यानंतर तिथे आणखी पाच तरूण कारने आले. अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केले. त्यावेळी काहींनी तिचे हात व पाय धरून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आली. त्यावेळी त्यांना मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी ( ८ जानेवारी ) पहाटे घराबाहेर असलेल्या त्यांच्या व्हॅनमध्ये कुटुंबाला मुलगी झोपलेली आढळून आली. त्यावेळी त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. तसेच ती रात्री घरापर्यंत चालत आल्याचे तिने सांगितले. दरम्यान, पहाटे परत आलेल्या पीडित मुलीने भीतीने तिच्या स्वत:च्या घराचा दरवाजाही ठोठावला नाही, ती घराबाहेर असलेल्या व्हॅनमध्येच पडून राहीली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बी.व्ही. गोहील यांनी दिली.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने पीडितेकडे शारिरीक संबंधांची मागणी केली होती. त्याला पीडितेने नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिचे अपहरण केले व तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.