एका अल्पवयीन मुलीला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अपहरण केले. त्या मुलीची थेट हरयाणात विक्री करून देहविक्री करण्यास भाग पाडले. तिच्यावर दोन मुलांचे मातृत्व लादल्याप्रकरणी बुधवारी आणखी एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. मानवी तस्करीच्या या प्रकरणात चंद्रपुरातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील त्या दोन महिलांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर, बुधवारी ताब्यात घेतलेल्या महिलेवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी १० ते १५ आरोपींची मानवी तस्करीची टोळी सक्रिय असून, त्यांच्या शोधार्थ चंद्रपूर पोलीस दलाने पाच पोलीस अधिकारी व तीन कर्मचारी, अशा एकूण आठ जणांचे पथक तैनात केले आहे. चंद्रपुरातील एक अल्पवयीन मुलगी खेळत असताना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेत तिला चंद्रपुरातील एका महिलेने रेल्वेने हरयाणात नेले. रेल्वेप्रवासात असताना पीडित मुलगी शुद्धीवर आली.

अनोळखी व्यक्ती बघून ती रडली. तेव्हा तिला पाण्यातून औषध देण्यात आले. त्यानंतर तिला हरयाणात नेण्यात आले. तिच्यावर कारनालमध्ये दोघांना विकले. तिथे आठ युवकांनी पिडितेवर अत्याचार केला. महानगरात पीडितेचे कुटुंब शोधत होते. तशी तक्रारही रामनगर पोलिसात नोंदवण्यात आली. मध्यंतरी आरोपी महिलांनी तिची वीस, पंचेवीस हजारात विक्री केली. याच काळात तिचे सात जणांशी लग्नही लावून दिले. पण, तिला काही काळापुरतेच संबंधित व्यक्ती ठेवून घ्यायचे. यातून तिच्यावर दोनदा मातृत्व लादण्यात आले.

काही दिवसांपूर्वी फतेहबाद येथील एका भाडय़ाच्या घरात तिला ठेवण्यात आले. मात्र त्या घरातील हालचालींचा घरमालकाला संशय आला. त्याने संबंधितांची चौकशी केली असता, प्रकरणाचे बिंग फुटले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पीडितेची या नरक यातनेतून सुटका झाली.

हरयाणा पोलिसांच्या मदतीने तिला चंद्रपुरात आणण्यात आले. सध्या या प्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.