दिल्लीत १६ वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून तिची हत्या करणाऱ्या साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर या ठिकाणी जाऊन त्याला अटक करण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने या विषयीचं वृत्त दिलं आहे. १६ वर्षांच्या या मुलीला साहिलने चाकूने भोसकलं त्यानंतर तिला दगडाने ठेचलं आणि तिची क्रूरपणे हत्या केली. यानंतर हा साहिल नावाचा तरुण घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्याला पोलिसांनी बुलंदशहरमधून अटक केली आहे.

नेमकी काय घडली घटना?

दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या CCTV मध्ये हे स्पष्ट दिसतं आहे साहिल नावाच्या माणसाने मुलीला चाकूने भोसकलं, त्यानंतर एका दगडाने तिला ठेचलं आणि तिची हत्या केली. ही घटना घडत असताना काही लोक तिथून येताना-जाताना दिसत आहेत पण कुणीही या मुलीला वाचवलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलने या मुलीला भोसकलं. साहिल आणि मुलीमध्ये चांगली मैत्री होती. ही मुलगी तिच्या मित्राच्या वाढदिवसासाठी चालली होती. त्यावेळी साहिलने तिला अडवलं. त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. हत्येनंतर साहिल फरार झाला होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी साहिलच्या अटकेनंतर काय म्हटलं आहे?

सीसीटीव्हीमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना कैद झाली होती. ही हत्या करणाऱ्या मुलाचं नाव साहिल आहे हे समजलं होतं. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेत होतो. आमची काही पथकं फरार झालेल्या साहिलला शोधण्यासाठी रवाना झाली होती. साहिलला आज अटक करण्यात आली आहे. ही हत्या का केली गेली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ही अल्पवयीन मुलगी कुठे चालली होती ते साहिलला माहित होतं. आम्ही त्याची चौकशी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पीडितेच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

मी माझ्या मुलीला पाहिलं तेव्हा तिच्या पोटात चाकूचे अनेक वार झाले होते. दगडामुळे तिच्या डोक्याचे चार तुकडे झाले होते. साहिल नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे. त्या दोघांच्या मैत्रीबाबत मला काही माहित नाही. आम्ही तिला सोबत घेऊन जात होतो तेव्हा कधीही तिला कुणीही छेडछाड केली नाही. तसंच या दोघांमध्ये काही ओळख होती वगैरे मला माहित नव्हतं. ANI शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

त्यानंतर पीडितेचे वडील म्हणाले, साहिल शाहबाद डेअरी भागातच तो राहतो. माझी मुलगी शाळेत जात होती. माझ्या मुलीला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आलं. तिची हत्या करणाऱ्यालाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं करण्याची कुणाची हिंमत पुन्हा होता कामा नये इतकं कठोर शासन त्याला झालं पाहिजे अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.