Minor Girl PM Modi Remarks: जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी १५ वर्षीय मुलींने जाहीरपणे माफी मागितली आहे. दिल्ली पोलिसांनी देखील या मुलींविरोधात अद्याप गुन्हा नोंद केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांत तीन वेळा घरं बदलावी लागली आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
नोएडात झिरो एफआयआर
पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी १५ वर्षीय मुलीविरोधात नोएडा पोलिसात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी एफआयआर दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तक्रारीत एका व्हिडीओचा संदर्भ देण्यात आला होता, यात अल्पवयीन मुलगी अपशब्द उच्चारताना दिसत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी मानहानी, जाणीवपूर्वक अपमान आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या वक्तव्यांसंबंधी भारतीय न्याय संहितेच्या कलमांचा समावेश होता.
बलात्कार आणि हत्येच्या धमक्या
तक्रार दाखल झाली तेव्हा ती मुलगी केवळ १४ वर्षांची होती आणि १ ऑगस्ट रोजी तिचे वय १५ वर्षे पूर्ण झाले आहे, असा दावा आता मुलीचे वकील अनिल कुमार यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत वकील अनिल कुमार यांनी एफआयआरच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माफी मागितल्यानंतरही अल्पवयीन मुलीला सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्कार आणि हत्येच्या धमक्या मिळत आहेत, असेही कुमार यांनी म्हटले.
तीनवेळा बदलले घर
सुरक्षेच्या कारणास्तव हे कुटुंब नोएडा येथून प्रथम फरिदाबाद येथील एका नातेवाईकाच्या घरी गेले. मात्र, तिथेही धमक्या सुरूच राहिल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अज्ञात ठिकाणी स्थलांतर करावे लागले. “ती दिल्लीतील एका शाळेत १० वी मध्ये शिकणारी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या दाव्यांप्रमाणे ती २५ वर्षांची नाही,” असे वकील अनिल कुमार यांनी सांगितले. “एफआयआरमधून तिचा पत्ता समोर आल्याने मुलीला थेट बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. भीतीपोटी त्यांना घर सोडावे लागले.” असेही ते म्हणाले.
मुलीकडून माफी
दरम्यान, जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान, कनॉट प्लेस येथे जमावाच्या प्रभावाखाली येऊन पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरल्याचे या मुलींने सांगितले. घडल्या प्रकाराबाबत माफी मागताना तिने, “मी जे बोलले ते चुकीचे होते. मी आधीही माफी मागितली आहे. हि माझी पहिली आणि शेवटची चूक असेल,” असेही तिने सांगितले.
