West Bengal Crime : काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. ही घटना ताजी असताना आता हुगळी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ही तरुणी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ट्यूशनक्लासवरून घरी जाताना घडली घटना
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी तरुणी ट्यूशन क्लासवरून घरी जात असताना ही घटना घडली. रात्री ती हुगळीतील एका रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या अंगावरचे कपडेही फाटले होते. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच तरुणीला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा – परिचारिका, अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पश्चिम बंगालमधील दोन सरकारी रुग्णालयांतील घटना; आरोपी अटकेत
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी तरुणीची ओळख गोपनीय ठेवावी, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
भाजपाकडून पश्चिम बंगाल सरकारवर टीका
या घटनेवरून भाजपानेही पश्चिम बंगाल सरकारला लक्ष्य केलं आहे. “पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी टीएमसीच्या नेत्यांना रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधींना रुग्णालयात जाऊ दिले नाही”, असा दावा भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी केला आहे. तसेच “सद्यस्थितीत पश्चिम बंगाल हे महिलांच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित राज्य असून ममता बॅनर्जी या महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा – राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक
महिलांवरील अत्याचाराचे सत्र काही थांबेना…
दरम्यान, कोलकाता येथील डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणाने पश्चिम बंगालमध्ये आधीच तणाव असताना, काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील हॉटेलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. याशिवाय राज्यातील दोन विविध ठिकाणच्या रुग्णालयांत परिचारिका आणि एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. यापैकी पहिली बीरभूम जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात घडली. तर दुसरी घटना हावडा जिल्ह्यात घडली. येथील सरकारी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.