पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वडील बलात्कार करत होते. वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी पाकिस्तानच्या लाहोर शहरातील गुज्जरपुरा भागात ही घटना घडली. आरोपी मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, तिचे वडील गेल्या तीन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होते.
या घटनेची अधिक माहिती देताना तपास अधिकारी सोहेल काझमी यांनी सांगितलं, “मागील तीन महिन्यांपासून तिला नरक यातना दिल्या जात होत्या, असं तिने सांगितलं. त्यामुळे आरोपी मुलीने तिच्या बलात्कारी वडिलांना ठार मारण्याचा निर्णय घेतला. शनिवारी तिने वडिलांची बंदूक घेऊन त्यांनाच गोळ्या घातल्या. या घटनेत मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
याप्रकरणी सर्व बाबींचा तपास करून संशयित मुलीवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सोहेल काझमी यांनी दिली. विशेष म्हणजे अन्य एका प्रकरणात पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेनंतर हे प्रकरण समोर आलं आहे.