भारतातील अल्पसंख्याकांना उग्रवादी गटांकडून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी केला. तसेच त्यांचा हा अजेंडा प्रादेशिक शांततेसाठी सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठा धोका आहे, असंही ते म्हणाले. डिसेंबरमध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणांच्या पार्श्वभूमीवर खान यांनी ट्विटरवरून हे आरोप केलेत.
भाजपा सरकार भारतातील अल्पसंख्याकांच्या, विशेषत: २० कोटी मुस्लिम समुदायाच्या नरसंहाराच्या आवाहनाचे समर्थन करते काय़? असा प्रश्न देखील खान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केला आहे. दरम्यान, या प्रकरणात “आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घेण्याची आणि कारवाई करण्याची वेळ आली आहे,” असंही ते म्हणाले.




खान यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर भारतातील अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आणि म्हटलं की, “हा उग्रवादी अजेंडा आपल्या प्रदेशातील शांततेसाठी एक वास्तविक आणि सध्याचा सर्वात मोठा धोका आहे.” गेल्या महिन्यात, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने भारताच्या अधिकाऱ्यांना बोलवून हरिद्वारच्या धर्म संसदेत केलेल्या कथित द्वेषयुक्त भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
काय म्हटलं होतं पाकिस्तानने?
एका अधिकृत निवेदनात, पाकिस्तान मंत्रालयाने म्हटले होते की, “भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रभारी एम सुरेश कुमार यांना इस्लामाबादमधील उच्चायुक्तामध्ये बोलावले आणि हिंदुत्व समर्थक भारतीय मुस्लिमांच्या नरसंहाराबद्दल बोलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.” पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, भारतासाठी ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे की आयोजकांनी कोणतीही खंत व्यक्त केली नाही किंवा भारत सरकारने त्यांचा निषेध केला नाही. त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे इस्लामबद्दलच्या भीतीची बिघडणारी प्रवृत्ती उघडकीस आणली आहे आणि भारतातील मुस्लिमांच्या भवितव्याचे भीषण चित्र रेखाटले आहे.
परराष्ट्र कार्यालयाने म्हटले होते की भारताने या द्वेषयुक्त भाषणांची आणि अल्पसंख्याकांविरुद्धच्या व्यापक हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
आता पाकिस्ताननेही भारताला सुनावलं; धर्म संसदेतल्या भाषणांवरून भारतीय अधिकाऱ्याकडे व्यक्त केली चिंता