फारूक यांचे मत
भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या जवळिकीमुळे तयार होणारे शांततेचे वातावरण बिघडवण्याचा दोन्ही देशांमधील भावना भडकावणाऱ्या लोकांना वाव मिळू नये याची उच्चपदस्थ राजकीय नेत्यांनी निश्चिती करावी, असे आवाहन जम्मू- काश्मीरमधील मवाळ फुटीरवादी गटाने केले आहे. दोन्ही देशांचे नेतृत्व शांतता प्रक्रिया ‘धाडसी मार्गाने’ सुरू ठेवून काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्दे सोडवेल, अशी आशा मिरवाईझ उमर फारूक यांच्या नेतृत्वातील हुर्रियत कॉन्फरन्सने व्यक्त केली. केंद्र सरकारशी बोलणी करणे आम्ही टाळणार नाही, परंतु कुठलाही संवाद ‘खुल्या मनाने’ व्हायला हवा, असेही संघटनेने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या शुक्रवारच्या भेटीमुळे केवळ दोन्ही देशांच्या लोकांच्याच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रात नवी आशा निर्माण झाली आहे, असे मत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असलेले फारूक यांनी व्यक्त केले. अनेक गतिरोधक पार करून सुरू झालेली शांतता प्रक्रिया वेग घेईल आणि दोन्ही देशांचे नेते एकत्र येऊन व काश्मिरी लोकांना सहभागी करून घेऊन काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्दय़ांवर तोडगा काढतील अशी आपल्याला आशा असल्याचे फारूक म्हणाले. तथापि, ज्यांना या भागात शांतता नको आहे असे लोक ही प्रक्रिया हाणून पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही पंतप्रधान लोकशाही मार्गाने निवडून आले असून त्यांना त्यांच्या देशात फार मोठा जनादेश आहे. त्यांना ही शांतता प्रक्रिया पुढे न्यायची असेल, तर दोन्ही देशांतील राजकीय विरोधक आणि सामान्य नागरिक यांचा त्यांना व्यापक पाठिंबा असणे गरजेचे आहे, असेही फारूक यांनी सांगितले.