‘मिर्झापूर २’ या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ललित ही भूमिका साकारणार अभिनेता ब्रम्हा मिश्राचे निधन झाले आहे. अभिनेता दिव्येंदू शर्माने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पण ब्रह्माच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्रम्हा मिश्राच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांना धक्काच बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत.

दिव्येंदू शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रह्मासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘ब्रह्मा मिश्राचे निधन झाले आहे. आपला ललित सर्वांना सोडून गेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय ब्रह्मा मिश्रा याचा मृतदेह त्यांच्या वर्सोवा येथील घरातील बाथरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे बोललं जात आहे. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला बाथरूममध्ये असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. मात्र याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.

ब्रह्मा मिश्रा गेल्या चार वर्षांपासून भाड्याच्या घरातच एकटाच राहत होता. वर्सोव्यातील एका सोसायटीमधून विचित्र वास येत असल्याची तक्रार करणारा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी ब्रह्मा यांच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर पाहिले तर त्याला आतून कुलूप होते. यानंतर पोलिसांनी चावी बनवणाऱ्याला बोलावून फ्लॅटचा दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडला. फ्लॅटच्या आत गेल्यानंतर बाथरूममधून दुर्गंध येत असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस बाथरूममध्ये गेले असता त्यांना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

ब्रह्मा हा मूळचा भोपालचा. पण तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहात होता. त्याने मिर्झापूर सिझन २मध्ये मुन्नाच्या मित्राची, ललितची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. २०१३मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘चोर चोर सुपर चोर’मधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘केसरी’ या चित्रपटात खुदादद खान ही भूमिका साकारली.