सुरक्षा दलांना नक्षलवादाविरोधातील मोहिमेत ऐतिहासिक यश मिळाले आहे. बंदी घातलेल्या ‘सीपीआय (माओवादी)’ या संघटनेचा शेवटचा सक्रिय केंद्रीय समिती सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेल्या बेसराला पकडण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या अटकेमुळे एकेकाळी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेल्या माओवादी संघटनेची सर्वोच्च संस्था आता पूर्णपणे निष्प्रभ झाली आहे.

या कारवाईदरम्यान बेसरासोबत त्याचे दोन जवळचे सहकारी गौरव हासदा आणि मोचू यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पारसनाथच्या टेकड्यांमध्ये थरार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनबाद आणि गिरिडीह जिल्ह्यांच्या सीमेवरील टुंडी-मांडिया जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली. पारसनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दाट जंगलात सुरक्षा दलांनी चहूबाजूंनी कोंडी केली होती.

सुरक्षा दलांचा प्रचंड बंदोबस्त आणि आदल्या दिवशीच त्याच्या मुख्य सहकाऱ्यांनी केलेले आत्मसमर्पण यामुळे बेसरा खचला होता. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो जंगलातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सतर्क सुरक्षा दलांनी त्याला जिवंत पकडले. तब्बल दोन दशकांनंतर हा ‘टॉप कमांडर’ जिवंत हाती लागल्याने नक्षलविरोधी मोहिमेतील हा मोठा टप्पा मानला जात आहे.

सर्वोच्च ‘केंद्रीय समिती’ आता पूर्णपणे उद्ध्वस्त

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसिर बेसराच्या अटकेमुळे माओवादी संघटनेचा एकही पोलिटब्युरो किंवा केंद्रीय समिती सदस्य आता जंगलात सक्रिय उरलेला नाही.

  • पूर्वीची ताकद: नक्षलवादी चळवळ ऐन भरात असताना या केंद्रीय समितीत ४० हून अधिक वरिष्ठ नेते होते.
  • सुरक्षा दलांचे यश: गेल्या काही वर्षांत राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे उरलेल्या २१ पैकी बहुतांश नेत्यांना कंठस्नान घालण्यात आले, काहींना अटक झाली तर काहींनी आत्मसमर्पण केले.
  • न झुकलेला नेता: मिसिर बेसरा हा असा एकमेव वरिष्ठ नेता होता जो सातत्याने आत्मसमर्पण करण्यास नकार देत जंगलातून कारवाया चालवत होता.

“२० वर्षांनी पाहिले, पण ते जिवंत सापडले याचा आनंद”

मिसिर बेसरा याच्या अटकेनंतर त्याचा मुलगा सिद्धार्थ बेसरा याने प्रतिक्रिया दिली आहे. “सुरक्षा यंत्रणांनी आम्हाला अनेकदा वडिलांशी संपर्क साधून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्याची विनंती केली होती. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच पोलिसांनी मला पुन्हा एकदा वडिलांना पत्र लिहून शरण येण्याचे आवाहन करण्यास सांगितले होते,” असे सिद्धार्थने सांगितले.

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी गेल्या २० वर्षांपासून माझ्या वडिलांना पाहिलेले नाही. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना कोणतीही हानी न पोहोचवता जिवंत पकडले, याचा मला आनंद आहे.”

पश्चिम सिंगभूमवरील नक्षलवादाचा शिक्का पुसणार?

पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडाच्या दाट जंगलात मिसिर बेसराचा थेट प्रभाव होता. याच कारणामुळे केंद्र सरकारने या जिल्ह्याला ‘नक्षलप्रभावित आणि चिंतेचा जिल्हा’ म्हणून घोषित केले होते.

छत्तीसगडमधील बस्तरसह देशातील इतर अनेक नक्षलवादी गढ आता मोठ्या प्रमाणात नक्षलमुक्त झाले आहेत. आता बेसराच्या अटकेनंतर गृह मंत्रालय पश्चिम सिंगभूम जिल्ह्याचा ‘विशेष नक्षलप्रभावित’ दर्जा काढून घेण्याबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.

२००३-०४ मध्ये सुरक्षा दलांवर भीषण हल्ले! तब्बल ५५ जवान शहीद…

अनेक वर्षे मिसिर बेसरा हे सुरक्षा दलांसाठी फक्त एक नाव होते. २००३ आणि २००४ मध्ये झालेल्या दोन मोठ्या नक्षली हल्ल्यांमध्ये तब्बल ५५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार बेसराच होता, परंतु त्याचा चेहरा कसा दिसतो हे सुरक्षा दलांना ठाऊक नव्हते.

सप्टेंबर २००७ मध्ये तो पहिल्यांदा एका साध्या वाहन तपासणीदरम्यान पकडला गेला होता. त्यावेळी त्याच्याकडून स्फोटके आणि रोकड जप्त करण्यात आली होती. “साडेपाच फूट उंची, कुरळे केस, गंभीर पण शांत आवाज आणि बोलण्यात अत्यंत संयमी,” अशी त्याची ओळख तत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितली होती. मात्र, नंतर तो जामिनावर सुटून पुन्हा भूमिगत झाला. अखेर १५ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.