दक्षिण कोरिया, जपानकडून चिंतेचा सूर

उत्तर कोरियाने मंगळवारी पाणबुडीवरून सोडण्याचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले असून त्या देशाच्या लष्करी क्षमतेचा हा परमोच्च बिंदू मानला जात आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे की, ही घटना या भागातील सुरक्षेला धोक्यात आणणारी असून अध्यक्ष जो बायडेन अमेरिकेत सत्तेवर आल्यानंतरचे हे सर्वांत मोेठे शक्तिप्रदर्शन आहे. उत्तर कोरियाशी अणुकार्यक्रमाबाबत वाटाघाटी करण्याचे बायडेन प्रशासनाने ठरवले आहे तसे आश्वासनही दिले आहे, तरी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या व शक्तिप्रदर्शन थांबण्यास तयार नाही. उत्तर कोरिया त्यांचे लष्करी सामर्थ्य वाढवतच चालला आहे.

दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाने कमी पल्ल्याचे एक क्षेपणास्त्र स्निपो या पूर्वेकडील बंदराच्या दिशेने सोडले. या क्षेपणास्त्र चाचणीचा अभ्यास आता अमेरिका व दक्षिण कोरिया करीत आहे.

दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे की, समुद्रावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले असले, तरी ते पाणबुडीतून सोडले असे ठामपणे म्हणता येणार नाही पण तशी शक्यता नाकारता येत नाही. 

जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी सांगितले की, त्यांच्या देशाने प्राथमिक विश्लेषण केले असून दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रे सोडण्यात आली आहेत. जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे की, सागरी सुरक्षा सल्ला जारी करण्यात आला असून क्षेपणास्त्र नेमके कुठे पडले हे समजलेले नाही.

स्निपो येथे मोठे संरक्षण उद्योग केंद्र असून उत्तर कोरियाने तेथे पाणबुडी निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. अलिकडच्या काही काळात स्निपो येथे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार केली जातात व ती पाणबुडीतून सोडण्यास अनुकूल असतात. उत्तर कोरियाने यापूर्वी कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी ऑक्टोबर २०१९ मध्ये केली होती.