ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आणि SIR प्रक्रियेला आव्हान देत १२ ऑक्टोबरला इंडिया आघाडीने दिल्लीत एका निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. राहुल गांधींच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल करण्यात आली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेट नाकारल्याने इंडिया आघाडीने दिल्लीत भव्य मोर्चा काढला होता. त्याआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग, मोदी सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकाही केली होती. सर्वोच्च न्यायालयात जी रिट याचिका दाखल करण्यात आली त्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने जवळपास १४ त्रुटी काढल्या आहेत. त्यामुळे या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता धूसर आहे.

इंडिया आघाडीच्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने काय त्रुटी दाखवल्या?

याचिकाकर्त्यांच्या नावांमध्ये चुका आहेत
जुन्या निर्णयांच्या प्रति याचिकांसह जोडलेल्या नाहीत
नऊ याचिकाकर्त्यांनी वकिलपत्र दिलेलं नाही
खासगी व्यक्तींना पक्षकार का बनवलं गेलं आहे ते कारण स्पष्ट नाही
मल्लिकार्जुन खरगेंच्या ओळखपत्राची छायाप्रत अस्पष्ट
याचिकेसह कोर्ट फीमध्ये २२० रुपये कमी
जोडलेली अनेक कागदपत्रं धुसर आणि अस्पष्ट
अखिलेश यादव आणि तेजस्वी यांच्यासह ९ नेत्यांनी सह्या केलेल्या नाहीत

इंडिया आघाडीने काय मागणी केली?

अशा १४ त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे या याचिकेवर आजच सुनावणी घेतली जाईल का? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. रजिस्ट्रीने याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित एकूण १४ आक्षेप नोंदवले आहेत. आपल्या याचिकेत इंडिया आघाडीने SIR शी संबंधित निवडणूक आयोगाच्या निर्णयांचा संपूर्ण रेकॉर्ड कोर्टासमोर सादर करण्याची मागणी केली आहे. त्यात २४ जून २०२५ रोजी SIR लाँच करण्याच्या निर्णयाशी संबंधित फाईल्स, बैठकीचा अजेंडा, कार्यवाहीचा तपशील आणि निवडणूक आयुक्तांनी दाखल केलेल्या हरकतींचाही समावेश आहे. आता भाजपा यावरून विरोधकांना खडे बोल सुनावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंडिया आघाडीच्या याचिकेत आक्षेप काय?

  • एसआयआर (SIR) लागू करण्याची पद्धत चुकीची आहे.
  • एसआयआर सुरू करण्यासंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करावीत
  • मतदार डेटाबेसचे स्वतंत्र लेखापरीक्षण
  • सुनावणी होईपर्यंत एसआयआरला स्थगिती द्यावी
  • फॉर्म-६ मधील बदलांसंबंधी प्रश्न
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतले
  • मतदार यादीतून नावे वगळण्यापूर्वी सूचना आणि सुनावणी आवश्यक
  • वगळलेल्या मतदारांची यादी द्यावी
  • ईव्हीएमचे पुनरावलोकन करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी