मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्यानंतर शोधकार्य सुरू असले तरी अजूनही गूढ कायमच आहे. हे विमान सापडलेले नसून ते बेपत्ता होण्यामागे दहशतवादी कारवाया असल्याची शक्यता मात्र फेटाळण्यात आली आहे. चोरलेल्या पासपोर्टच्या आधारे ज्या दोन इराणी व्यक्तींनी प्रवास केला त्यांचा कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हता, असे स्पष्ट झाले आहे. चीनच्या एका उच्च विवर्तन उपग्रहाला चार ठिकाणी तेलाचे थर दिसले असून ते मलेशियाच्या बेपत्ता विमानातून बाहेर पडले असावेत, असा अंदाज आहे त्यामुळे या विमानाच्या बहुराष्ट्रीय शोधाला नवी दिशा मिळाली आहे. या विमानात २३९ जण होते व त्यात पाच भारतीय होते. दक्षिण चीनच्या  समुद्रात हे विमान नाहीसे झाले.
इंटरपोलने मंगळवारी सांगितले की, मलेशिया एअरलाइनच्या एमएच ३७० विमानाने पोरी नूर महंमदी (वय १९) व देलावर सुयेद महंमद रेझा ( वय ३०) या दोन इराणी व्यक्तिंनी चोरीच्या पासपोर्टने प्रवास केला. मात्र या दोघांचा दहशतवादी संघटनांशी काही संबंध नसल्याचे दिसत आहे. या दोघांपैकी एकजण जर्मनीला जाणार होता, त्याच्या आईशी संपर्क साधण्यात आला असून ती फ्रँकफर्ट विमानतळावर त्याची वाट पाहात होती.  
इंटरपोलचे महासचिव रिचर्ड नोबल यांनी सांगितले की, ते दोघे दोहा ते क्वालालंपूर दरम्यान इराणी पासपोर्टने जात होते व नंतर त्यांनी ऑस्ट्रियन व इटालियन पासपोर्ट चोरून ते बीजिंगकडे जाणाऱ्या विमानात बसले. नोबल यांनी या विमानाच्या बेपत्ता होण्याचा दहशतवादाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. किमान ते दोघे दहशतवादी नव्हते. विमानाच्या शोध मोहीमेचा सोमवारी चौथा दिवस होता.
अपहरण, घातपात, प्रवाशांचे मानसिक प्रश्न अशा अनेक मुद्दय़ांचा विचार करण्यात
आला. व्हिएतनाम व मलेशियाच्या समुद्रात
किमान ४० जहाजे व ३४ विमाने या विमानाचा शोध घेत आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, फिलीपीन्स, न्यूझीलंड, अमेरिका हे देश शोधकार्यात सहभागी आहेत.