९ दिवसांपूर्वी ४२ वर्षांची एक महिला घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर आता तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तिचा गळा दाबण्यात आला होता आणि तिला ठार करून तिचा मृतदेह पुरण्यात आला होता. तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. झारखंडमधल्या बोकारो या ठिकाणी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एक ४२ वर्षांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. या महिलेचा शोध सुरु होता. पोलिसांना एका महिलेचा मृतदेह पुरलेला आढळून आला. हा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह सदर ४२ वर्षीय महिलेचा आहे हे पोलिसांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. मुस्तकीम अन्सारी या ५२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यान चौकशी दरम्यान ४२ वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की ४ सप्टेंबरला ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. पोलिसांनी सांगितलं की सदर महिला आणि अन्सारी यांचे प्रेमसंबंध होते. हे दोघंही रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. याच दरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले. ४ सप्टेंबरला हे दोघंही नेहमीप्रमाणे कामावर गेले. पण त्यानंतर ही महिला बेपत्ता झाली होती. पोलिसांनी सांगितलं की ७ सप्टेंबरला अन्सारी हा त्या ठिकाणी पुन्हा गेला होता. त्याने एक खड्डा खणला आणि त्यानंतर महिलेचा मृतदेह पुरला. त्याने तिची हत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव रंजन यांनी सांगितलं की अन्सारीने ४ सप्टेंबरलाच गळा दाबून या महिलेची हत्या केली. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह पुरला.
