भारतीय कलाकार मिताली साळुंके हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला तीव्र टीकेचा सामना करावा लागला. विमानाच्या खिडकीवर भगवान गणेशाचं चित्र काढताना ती दिसत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप केला. मात्र, टीका वाढल्यानंतर मितालीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

‘प्रवासात नवं कॅनव्हास सापडलं’

मितालीने स्वतः हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती विमानाच्या खिडकीवर गणपतीच्या चित्राची आउटलाइन काढताना दिसते. त्यानंतर चित्रात रंग भरले जातात आणि अखेरीस भगवान गणेशाचं सुंदर चित्र तयार झालेलं दिसतं. “प्रवास करताना नवं कॅनव्हास सापडलं” अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडीओ शेअर केला.

एका दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोहोचला आणि त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.

‘सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान’

काही युजर्सनी मितालीवर विमानाच्या खिडकीवर थेट रंगकाम केल्याचा आरोप केला. एका युजरने, “ते जिथे जातात तिथे मालमत्तेचं नुकसान करतात,” अशी टीका केली. तर दुसऱ्या युजरने हा प्रकार “घृणास्पद” असल्याचे म्हणत अशा कृत्यासाठी दंड किंवा अटकेची मागणी केली. आणखी एका युजरने विमानाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित व्यक्तीवर विमान प्रवासाची बंदी घालण्याची मागणी केली.

काही नेटकऱ्यांनी विमानाच्या खिडकीवर कोणतीही वस्तू लावणे किंवा खिडकी झाकणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही सांगितले. विशेषतः विमानाच्या उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी खिडक्यांमधून बाहेरील परिस्थिती पाहता येणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कलाकाराने दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओवर टीका वाढल्यानंतर मिताली साळुंकेने इन्स्टाग्रामवरील कमेंटमध्ये स्पष्टीकरण दिलं. तिने विमानाच्या खिडकीवर थेट चित्र काढले नसून पारदर्शक कागदावर चित्र काढले होते, असे तिने स्पष्ट केले.

“इट्स अ ट्रान्स्परन्ट शीट,” अशी कमेंट करत तिने हे चित्र खिडकीवर नव्हे, तर पारदर्शक कागदावर असल्याचे सांगितले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तिने एक फोटोही शेअर केला. या फोटोमध्ये ती स्वतःच्या हातात चित्र काढलेली पारदर्शक शीट धरलेली दिसत आहे, त्यामुळे विमानाच्या खिडकीला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

कोण आहे मिताली साळुंके?

मिताली साळुंके आणि चेतन अडविरकर ही जोडी ‘लाइव्ह इंडियन पेंटर’ या नावाने कार्यरत असून, दोघेही विवाहसोहळ्यांमध्ये प्रत्यक्ष कॅनव्हासवर चित्रे काढण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विवाहसोहळ्यांमध्ये प्रत्यक्ष चित्रकलेच्या प्रवासाची सुरुवात २०१८ पासून केली होती.

लग्नसमारंभात घडणारे खास क्षण त्याच वेळी कॅनव्हासवर रंगवण्याचे काम ही जोडी करते. विमानातील व्हिडीओमुळे मात्र त्यांचे नाव वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले.

दरम्यान, विमानाच्या खिडकीवर थेट पेंटिंग केल्याचा गैरसमज झाल्याने सुरुवातीला मोठी टीका झाली. मात्र, कलाकाराच्या स्पष्टीकरणानंतर चित्र पारदर्शक कागदावर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.