पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. आता मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल सरकारमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची माहिती व सांस्कृतिक व्यवहार विभागाचे मुख्य सल्लागार म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. आता या नव्या पदासह मिथुन चक्रवर्ती यांना थेट कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांची ही नियुक्ती पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिल्यामुळे आता पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील स्थान आणखी मजबूत करण्यासाठी फायदा होईल असं बोललं जात आहे. या नियुक्तीमागे देखील काही राजकीय गणित असल्याचं सांगितलं जात आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेला ‘माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभाग’ हा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अखत्यारीत येतो. या पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. दरम्यान, या मिथुन चक्रवर्ती यांच्यावर या विभागाची जबाबदारी सोपवल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
लोकप्रिय चेहरा ते भाजपाचे प्रमुख प्रचारक
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतिशय परिचित नावांपैकी एक असलेले मिथुन चक्रवर्ती हे भाजपाचे सक्रिय प्रचारक आणि पश्चिम बंगालमधील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. कारण पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपासाठी जोरदार प्रचार केला होता. विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार सत्तेत आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
